
देवगड : सध्याचे पारंपरिक शिक्षण हे नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने तसे कमी पडू लागलं आहे. बेकारी वाढत आहे. सुशिक्षित बेकरांची संख्याही लक्षणीय आहे. या साठी पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड असणे आवश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल सुरू करत असलेला हा "बहुविध कौशल्य अभ्यासक्रम" हे एक आश्वासक पाऊल आहे.
बहुविध कौशल्य अभ्यासक्रम" म्हणजेच Multi Skill Foundation Course.( MSF ) हा उच्च माध्यमिक शिक्षण अधिक व्यावहार्य आणि जीवनाभिमुख करणारा अभ्यासक्रम आहे. यात तांत्रिक कौशल्ये ही जीवन कौशल्याबरोबर जोडली जातात. याचा परिणाम म्हणून हे शिक्षण घेऊन बाहेर पडणारी मुले एक वेगळा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन जीवनाला सामोरी जाऊ शकतात. या अभ्यासक्रमाला शासन मान्यता आणि उत्तेजन आहे.म्हणूनच हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या मुलांसाठी IIT आणि Polytechnic अभ्यासक्रमात प्रवेशासाठी वेगळे प्राधान्य मिळते.आणि विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम नेहमीच्या 8 वी 9 वी च्या विषयांबरोबरच राबविला जातो.
यात चार प्रकारचे प्रशिक्षण घेता येते. अभियांत्रिकी तंत्रज्ञान, ऊर्जा व पर्यावरण, शेती व बागकाम आणि अन्न प्रक्रिया. या चारही क्षेत्रांचे प्रात्यक्षिकासह ज्ञान मुलांना दिले जाते. दर आठवड्याला घड्याळी 3 तास या विषयासाठी असतात. यातील 90 टक्के अभ्यासक्रम हा प्रात्यक्षिकावर आधारित असतो. शालेय स्तरावर दिले जाणारे शिक्षण आणि वास्तविक जीवनात आवश्यक असलेली कौशल्ये यांच्यातील दुवा म्हणून हा उपक्रम काम करतो. याचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे उदरनिर्वाहाच्या शोधात तरुणांचे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर काही प्रमाणात तरी रोकता येऊ शकते. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील किमान सतरा अठरा शाळानी सदर उपक्रमात सहभाग घेऊन हा अभ्यासक्रम ते यशस्वीपणे राबवत आहेत. तसेच आपले जिल्ह्यात कुडाळ येथे माड्याची वाडी हायस्कूलमध्ये भगीरथ चे डॉ. प्रसाद देवधर यांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम अतिशय यशस्वीपणे राबवला जात आहे.
एकूण पाहता जामसंडे हायस्कूल आणि संस्था अध्यक्ष माजी आमदार एडवोकेट अजित गोगटे व सहकारी यांनी बदलत्या काळाचा मागवा घेत अतिशय योग्य दिशेने टाकलेले हे दमदार पाऊल आहे.काळा बरोबर राहण्यासाठी ही एक आवश्यक गोष्ट झालेली आहे.










