मच्छीमार संकटात | मदतीसाठी सरकारला साकडं

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 02, 2025 14:38 PM
views 79  views

देवगड : देवगड तालुक्यातील ब्राह्मणदेव मंदिर मध्ये तालुक्यातील मच्छीमार बांधव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असलेले वादळी हवामान, परप्रांतीय नौकांची वाढती मासेमारी आणि बदलती समुद्री परिस्थिती यामुळे कोकणासह राज्यातील मच्छीमारांचा व्यवसाय मोठ्या संकटात आला असून या संकटातून सावरण्यासाठी मच्छीमारांना शासनाकडून आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी मच्छीमार आर्थिक संकटात असताना आर्थिक मदतीसाठी सरकारकडे मागणी केली आहे.

यावेळी ज्ञानेश्वर खवळे, प्रदीप कोयंडे, बाळा कोंयडे ,सचिन कदम, शामराव पाटील, विश्वास भुजबळ, संतोष लब्दे,द दिनेश धुवाळी आदीसह ट्राँलिंग फिशिंग, गिलनेट धारक, पातधारक नौका, कांडाळी ,रापणसंघ, आदी मच्छीमार उपस्थित होते. यंदाचा हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले तरी, सततचा पाऊस आणि वादळसदृश परिस्थितीमुळे समुद्रात जाणे धोक्याचे ठरत आहे.

मच्छीमारांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने मासेमारीला “मत्स्यशेती” म्हणून मान्यता दिली असली तरी सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांप्रमाणेच दुष्काळासमानआहे.त्यामुळे मासेमारी हंगामावर दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट आले असून, मच्छीमारांकडे आर्थिक साधनांची कमतरता निर्माण झाली आहे.मच्छीमार संघटनांनी शासनाकडे मागणी केली आहे की,“मत्स्य दुष्काळ” जाहीर करून राज्य आणि केंद्र शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.

तसेच मच्छीमारांचे थकीत कर्ज माफ करून त्यांना दिलासा द्यावा.या व्यवसायावर अवलंबून असलेले टॉलर मालक, पातधारक नौका, खलाशी वर्ग, मासे विक्रेते, मासे सुकविणाऱ्या महिला-पुरुष, टेम्पो व्यावसायिक रापणसंघ आणि पारंपारिक मच्छीमार यांनाही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर मच्छीमार बांधव रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असा यावेळी उपस्थित मच्छीमार बांधवांनी इशारा दिला आहे.