
देवगड : किल्ले बनविणे स्पर्धा म्हणजे केवळ कला नव्हे , तर ती आपल्या इतिहासाशी नाते जोडणारी सर्जनशील साधना आहे असे प्रतिपादन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी व्यक्त केले. जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे मॉडेल तयार करा या विषयावर कला शिक्षक मृत्युंजय मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या प्रसंगी जेष्ठ शिक्षक संजय पांचाळ, कला शिक्षक मृत्युंजय मुणगेकर, चेतन पुजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
किल्ले बनविणे स्पर्धा या उपक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची सुंदर व वास्तववादी मॉडेल्स विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, ऐतिहासिक भावना व सर्जनशीलता वृद्धिंगत होते असे ते म्हणाले. मुख्याध्यापक जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत अशा स्पर्धा इतिहास जिवंत ठेवतात असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी माती, कागद, वाळु, रंग अशा विविध साहित्यांचा वापर करून राजगड, रायगड, प्रतापगड, सिंहगड सिंधुदुर्ग, लोहगड अशा ऐतिहासिक किल्ल्यांची सुंदर व वास्तवदर्शी मॉडेल्स साकारली. या उपक्रमामधून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, किल्ल्यांचे सामरिक महत्त्व व मराठी इतिहासाचा अभिमान यांचा अभ्यास केला. या किल्ल्यांमधून इतिहास अक्षरशः जिवंत झाला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मानसी मुणगेकर, मयूरेश्वरी मांजरे, सुजित फडके यांनी काम पाहिलं.