
देवगड : देवगड येथील तुळशीकाटा येथील तुषार तुकाराम भाबल यांच्या कलम बागेला लागलेल्या अचानक आगीमध्ये २० मोठी हापूस आंबा कलमे होरपळली असून या घटनेत सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. स्थानिक ग्रामस्थानीं तात्काळ धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आग नियंत्रणात आली. ही घटना बुधवारी दुपारी ३:३० च्या सुमारास घडली आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवगड तुळशीकाटा येथील तुषार भाबल यांच्या मालकीच्या कलम बागेत ६० कलमे असून या बागेला बुधवारी दुपारी ३:३० च्या सुमारास अचानक आग लागली. शेजारील बागेत काम करत असलेल्या नागरिकांनी आग लागल्याचे समजताच त्यांनी धावाधाव करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीबाबत माहिती तात्काळ तुषार भाबल यांना कळविल्यानंतर तेही घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, किशोर कणेरकर, नरेश मेस्त्री आदी ग्रामस्थ आणि आग विझविण्यासाठी आटोकाठ प्रयत्न केले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले अन्यथा इतर बागांनाही आगेची झळ बसली असती. या अग्नी तांडवांमध्ये भाबल यांच्या बागेतील २० कलमी पूर्णतः होरपळली यामध्ये काही झाडांवर आंबे देखील होते. याबाबत जामसंडे तलाठी संतोष डांगे यांनी कळविल्यानंतर घटनास्थळी जाऊन कृषी सहाय्यक एच एच सलगरकर यांच्या समवेत नुकसानीचा पंचनामा केला. या घटनेत भाबल यांची २० कलमे होरपळली असून सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे.