
देवगड : विठ्ठल नामाची शाळा भरली…. विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला…. पंढरीचा विठ्ठल विटेवरी…. हरिनामाचा गजर होतो साळशी गावात….या सारख्या भक्तीगीता बरोबरच टाळ-मृदुंगाच्या व विठ्ठल नामाच्या गजराने अवधी साळशी दुमदुमून गेली. या हरिनाम सप्ताहात शेवटच्या राञी साळशी येथील श्री संत सिध्देश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळाने काढलेला ‘ञाटिका वध’ हा पौराणिक चित्र देखावा सर्वांचे आकर्षण ठरुन उपस्थितांची मने जिंकली.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व चौ-याऐंशी खेड्यांचा अधिपती असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील श्री देवी पावणाई देवालयात अखंड हरिनाम सप्ताह बुधवार ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या हरिनाम सप्ताहानिमित्त श्री पावणाई देवालयात आकर्षक मंदिर सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या हरिनाम सप्ताहाच्या उत्सव काळात भावई प्रासादिक भजन मंडळ व एकात्मता हरिपाठ भजन मंडळ वरेरी, पावणाई भगवती भजन मंडळ व श्री देव बांदेश्वर भजन मंडळ बांदिवडे,श्री देव स्थानेश्वर प्रासादिक भजन मंडळ भरणी – घाडी वाडी, एस टी डिव्हिजन वर्कशॉप कणकवली, गांगेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ चाफेड- घाडीवाडी आणि गायगोठण गणेश प्रासादिक भजन मंडळ चाफेड भोगलेवाडी, रोहिलेवाडी भजन मंडळ आयनल,सुदर्शन भजन मंडळ व पावणाई बांदेश्वर भजन मंडळ रामनगर शिरगाव, श्री देव चौचार भजन मंडळ मुरमणेवाडी तारामुंबरी, कुलस्वामिनी भजन मंडळ कोळोशी, पावणाई गांगेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ वळीवंडे, मठवुद्रुक भजन मंडळ, फोंडकण देवी भजन मंडळ निरोम,महालक्ष्मी भजन मंडळ रेंबवली, हेदुबाई प्रसादिक भजन मंडळ खुडी, गावडेश्वर प्रासादिक भजन मंडळ आसोली वेंगुर्ले,आदी २१ भजनी दिंड्या हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्या होत्या.
तसेच कोळोशी येथील नवजीवन भगीनी महिला भजन मंडळाच्या सहभागामुळे हरिनाम सप्ताहाची रंगत आणखीनच वाढली. साळशी -अंगणवाडीतील चिमुकल्यानीही हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या रात्री साळशी येथील श्री संत सिध्देश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळाने रंगीत दिंडी काढून ‘ञाटिका वध’ हा पौराणीक चित्र देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये राम- अमेय माळवदे, लक्ष्मण- सचिन माळवदे, ऋषी- निखिल पारधी, पंकज लाड व दिनेश मणचेकर,ञाटिका-संतोष नारिंग्रेकर, यांनी भूमिका साकारल्या होत्या. तसेच राजेंद्र घाडी, प्रविण नाडणकर , श्रेयस नाडणकर,पियुष गावकर, श्रवण गावकर, प्रकाश किजवडेकर यांनीही आकर्षक वेशभुषा सादर केली होती.हा पौराणिक चिञ देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.तसेच माहेरवाशीणीची आवर्जून उपस्थिती होती.या हरिनाम सप्ताहाची सांगता ११ ऑक्टोबरला पहाटे काकड आरतीने झाली. या हरिनाम सप्ताहामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण होऊन विठ्ठल नामाच्या गजराने गाव दुमदुमून गेला .