गणेशोत्सवाचं नियोजन ; देवगड न.पं. ची बैठक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 07, 2025 20:13 PM
views 63  views

देवगड : देवगड तालुक्यात देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालय येथे गणेश उत्सव काळात वाहतुकीचे नियोजन व अन्य सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत कार्यालय येथे बैठक नुकतीच संपन्न झाली. 

या बैठकीत प्रामुख्याने गणेशोत्सव काळात येणारे मुंबई चाकरमानी, त्याचबरोबर वाढती वाहतूक कोंडी त्यावर योग्य ते नियोजन करण्याबाबत विशेष चर्चा करण्यात आली.

यात आठवडा बाजारचे योग्य नियोजन, स्वच्छता, त्याचबरोबर ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था व तसे फलक लावणे, एकेरी दिशा मार्ग ,दुचाकी तीन चाकी वाहनांची पार्किंग,याविषयावर भर देण्यात आला.

तसेच देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरु करणे प्रसंगी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी समवेत योग्य ती सोयी सुविधा निर्माण करून देणे.खंडित वीजपुरवठा बाबत दक्षता घेणे, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली गवत झाडी, झाडाच्या फांद्या साफ करणे,त्याचप्रमाणे प्रभाग निहाय गणेशोत्सव मार्गांची साफसफाई गणेश घाट यांची साफसफाई त्या ठिकाणी पुरेशी विद्युत सुविधा निर्माण करणे याबाबत उपस्थित नगरसेवक, व्यापारी प्रतिनिधी, रिक्षा व्यवसायिक यांनी सूचना केल्या.

यावेळी याठिकाणी उपस्थित नगरसेवकांनी देवगड जामसंडे शहराला किमान एक दिवस सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात यावे, गणेशोत्सव काळात  पाणी पुरवठा करण्यात यावा अशी सूचना केली नियमांचे पालन करून स्वागत बॅनर लावण्यात यावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी या गणेशोत्सव काळात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठीपोलीस प्रशासनाने नगरपंचायतीमार्फत निश्चित करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्था, त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस होमगार्ड, तैनात करण्यात येतील. यासाठी व्यापारी बंधू, नगरपंचायत लोकप्रतिनिधी रिक्षा व्यावसायिक व स्थानिक ग्रामस्थ यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना बंद घरांमधून चोरीचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने हालचाली निदर्शनास आल्यास अथवा काही संशय गोष्टी आढळून आल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा नियमित ठिकठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून देवगड जामसांडे शहराबरोबर तळेबाजार शिरगाव या ठिकाणी देखील योग्य तो पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नाकाबंदी याबरोबरच मुख्यमंत्री कृती आराखडा अंतर्गत गणेशोत्सव काळात सार्वजनिक कार्यक्रमाकरिता अथवा सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता ध्वनिक्षेपकाचा वापर करावयाचा असल्यास ध्वनिक्षेपक परवाना घेणे आवश्यक आहे. यासाठी देवगड पोलीस प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन परवाना देण्यात येईल. प्रसंगी ध्वनिक्षेपक परवाना बाबत अधिक माहितीसाठी देवगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा व सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. या चर्चेत नगरसेवक बुवा तारी, नितीन बांदेकर, तन्वी चांदोस्कर, रुचाली पाटकर, विशाल मांजरेकर यांनी सहभाग घेतला होता.

या बैठकीला मुख्याधिकारी गौरी पाटील, बांधकाम समिती सभापती शरद ठुकरुल, आरोग्य शिक्षण सभापती आद्या गुमास्ते पोलीस निरीक्षक भरत धुमाळ वैद्यकीय अधीक्षक पाटोदेकर, अभियंता छाया परब उपस्थित होते .