
देवगड : खरीप हंगामातील पिकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील शिरगाव येथील शेवरे तांबळवाडी परिसरात भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकरी विठोबा घाडी यांच्या शेतातील भातपिकाची पाहणी करताना पिकाची वाढ खुंटल्याचे निदर्शनास आले.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्यामुळे शेतीवर परिणाम झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी पालकमंत्री राणे यांना दिली. उपसभापती अमोल लोके यांनीही परिसरातील पिकांची स्थिती आणि पाणीटंचाईबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार शीतल जाधव यांच्यासह जलसंधारण व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या भावना आणि प्रत्यक्ष परिस्थिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी आवश्यक असून, त्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सरसकट मदतीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
दरम्यान, शिरगाव परिसरातील ग्रामस्थांनी शिरगाव लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या (लपा) तलावाच्या गेटच्या दुरुस्तीची मागणी पालकमंत्री राणे यांच्याकडे केली. परिसरातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी तलावाच्या गेटची दुरुस्ती आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याची दखल घेत पालकमंत्री राणे यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना गेट दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.










