
देवगड : मणचे पंचायत समिती मतदारसंघातील पराभवासाठी भाजप आणि पालकमंत्री नितेश राणे यांना जबाबदार धरण्याऐवजी शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांचा पराभव हा कोणत्याही राजकीय कटकारस्थानामुळे नव्हे, तर स्थानिक जनतेच्या निर्णयामुळे झाला असून त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत, असा जोरदार पलटवार भाजप पडेल मंडळ अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी केला आहे. विलास साळसकर यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन मणचे पंचायत समिती निवडणुकीतील आपल्या पराभवासाठी भाजप आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना नारकर यांनी साळसकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
नारकर म्हणाले की, मणचे पंचायत समिती मतदारसंघातील वास्तव परिस्थिती जनतेला चांगली माहिती आहे. या मतदारसंघात साळसकर यांचा पराभव हा त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीमुळे आणि जनतेतील नाराजीमुळे झाला आहे. मुळात साळसकर हे मणचे पंचायत समिती मतदारसंघातील स्थानिक मतदार नसून ते शिरगाव-साळशी गावचे रहिवासी आहेत. त्यामुळे मतदारसंघातील जनतेसमोर स्थानिक उमेदवार आणि बाहेरील उमेदवार असा प्रश्न निर्माण झाला होता.
मतदारांनी स्थानिक प्रश्न, स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक उमेदवार यांना प्राधान्य देत विष्णू घाडी यांच्यावर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे विष्णू घाडी यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आणि साळसकर यांचा पराभव झाला. हा पराभव जनतेच्या लोकशाही निर्णयाचा परिणाम असताना त्यासाठी इतरांवर आरोप करणे योग्य नसल्याचे नारकर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, महायुती धर्म पाळत भाजपने मणचे पंचायत समिती मतदारसंघाची जागा शिवसेना (शिंदे गट) यांना दिली होती. या मतदारसंघात भाजपकडे माजी पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते फरीद काझी, अमोल तेली, बाबा अमलोस्कर यांच्यासारखे सक्षम व तगडे इच्छुक उमेदवार असतानाही महायुतीचा धर्म जपत भाजपने स्वतःचा दावा मागे घेत ही जागा विलास साळसकर यांच्यासाठी सोडली होती. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर अन्याय केला किंवा त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, हा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वतः पालकमंत्री नितेश राणे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून साळसकर यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने आत्मीयतेने प्रचारात सहभाग घेतला. महायुतीचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन मेहनत घेतली. अशा परिस्थितीत भाजपवर पराभवाचे खापर फोडणे म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा अपमान असल्याची टीकाही त्यांनी केली.
नारकर यांनी साळसकर यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात तसेच त्याआधी काही ग्रामपंचायतींतील सरपंच आणि लोकप्रतिनिधींविरोधात माहिती अधिकाराचा वापर करून वारंवार माहिती मागविण्याचे प्रकार झाले. अनेक सरपंचांना विनाकारण त्रास देण्याचे काम करण्यात आले. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मणचे पंचायत समिती मतदारसंघातील अनेक गावांमध्ये विकासाच्या मुद्यांपेक्षा वैयक्तिक वाद आणि आरोप-प्रत्यारोप यांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना जनतेत निर्माण झाली होती. त्यामुळे मतदारांनी मतदान करताना या सर्व बाबींचा विचार केला आणि आपला कौल दिला. परिणामी स्थानिक उमेदवार विष्णू घाडी यांना विजय मिळाला, असेही नारकर यांनी सांगितले.
“निवडणुकीतील पराभव स्वीकारण्याची राजकीय परिपक्वता प्रत्येक नेत्याने दाखवली पाहिजे. पराभवाचे कारण शोधताना जनतेचा कौल आणि स्थानिक परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी विरोधकांवर किंवा मित्रपक्षांवर आरोप करून वास्तव बदलत नाही,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांवर नारकर यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन असून राजकीय नैराश्यातून करण्यात आलेले दिसतात.
“मणचे पंचायत समिती निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा स्पष्ट आणि लोकशाही पद्धतीने दिलेला निर्णय होता. त्या निर्णयाचा आदर करण्याऐवजी त्यामागे कटकारस्थान शोधणे चुकीचे आहे. भाजपने महायुतीचा धर्म जपत स्वतःचे सक्षम उमेदवार बाजूला ठेवून विलास साळसकर यांना संधी दिली होती. मात्र जनतेने स्थानिक उमेदवार विष्णू घाडी यांच्यावर विश्वास दाखविला. हा विजय जनतेचा आणि स्थानिक नेतृत्वाचा विजय आहे,” असे सांगत महेश उर्फ बंड्या नारकर यांनी विलास साळसकर यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.










