
देवगड : टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर करून देवगड हापूस आंबा उत्पादनात नवे प्रयोग करणारे प्रगतशील आंबा बागायतदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देवगड हापूस आंब्याची पेटी भेट देत कोकणातील आंबा बागायतदारांच्या विविध समस्या व मागण्या मांडल्या. पुणे येथील रहिवासी असलेले राहुल शेवाळे यांनी कोकणावरील प्रेमातून तीन वर्षांपूर्वी देवगड येथे हापूस आंब्याची बाग खरेदी करून आंबा व्यवसायात पदार्पण केले. बदलत्या वातावरणाचा आंबा पिकावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आंबा उत्पादन कसे टिकवता येईल याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आंबा स्कॅनिंग मशीनसाठी अनुदान देण्याची मागणी केली. सध्या या मशीनची किंमत सुमारे ४० ते ५० लाख रुपये असून सर्वसामान्य आंबा बागायतदारांना ते परवडणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने यावर सबसिडी दिल्यास आंब्याची गुणवत्ता तपासणी, निर्यात व बाजारपेठ वाढीस मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच देवगड हापूस आंब्यामध्ये साका (आंबा खराब होण्याचे प्रमाण) मोठ्या प्रमाणात आढळून येत असून यावर सखोल संशोधन होणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणीही राहुल शेवाळे यांनी यावेळी केली. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल शेवाळे यांना दिल्ली येथे चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले असून देवगड हापूस आंब्याच्या मागणी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करू असे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आंबा बागायतदारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आंबा स्कॅनिंग मशीनसाठी जास्तीत जास्त अनुदान देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे सांगितले.
राहुल शेवाळे यांच्या या पुढाकारामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देवगड हापूसला देशपातळीवर अधिक मोठी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी , सिद्धार्थ शेवाळे, सार्थक शेवाळे उपस्थित होते.










