सिंधुदुर्गात 'विकसित भारत पदयात्रा'

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 29, 2025 13:57 PM
views 108  views

सिंधुदुर्गनगरी : देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभर “Sardar@150 Unity March” चे आयोजन करण्यात आले असून, त्याचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ८ ते १० किलोमीटर लांबीची पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून, जिल्हावासीयांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मेरा युवा भारत (My Bharat) सिंधुदुर्गचे उपसंचालक कालिदास घाटवळ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ उपस्थित होत्या.

ही पदयात्रा युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय आणि “My Bharat” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान, एकतेची भावना आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करणे हा आहे. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसहभागातून राष्ट्र उभारणीच्या दृष्टीकोनातून प्रेरित असून, तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी खुला आहे.

अभियानाची पार्श्वभूमी :

या देशव्यापी अभियानाची डिजिटल सुरुवात ६ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते My Bharat पोर्टलवरून करण्यात आली. या डिजिटल टप्प्यात सोशल मिडिया रील स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा आणि Sardar@150 Young Leaders Program अशा उपक्रमांचा समावेश आहे. या प्रोग्राममधील १५० विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

अभियानाचे प्रमुख टप्पे :

 जिल्हास्तरीय पदयात्रा (३१ ऑक्टोबर – २५ नोव्हेंबर २०२५) 

प्रत्येक जिल्ह्यात ८ ते १० किलोमीटर लांबीची एक दिवसाची पदयात्रा होणार.  पदयात्रेपूर्वी शाळा आणि महाविद्यालयांत निबंध, वादविवाद, पथनाट्ये तसेच सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्र आयोजित केले जातील.

“ड्रग्जमुक्त भारत” आणि “गर्वाने स्वदेशी” या प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून घेतल्या जातील. या काळात योग व आरोग्य शिबिरे तसेच स्वच्छता अभियान राबवले जाईल. पदयात्रेदरम्यान सरदार पटेल प्रतिमा पूजन, आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरण होईल. या यात्रेचे नेतृत्व राज्य व केंद्र सरकारचे मंत्री, खासदार, स्थानिक अधिकारी, NCC व NSS चे प्रतिनिधी करतील.

 राष्ट्रीय पदयात्रा (२६ नोव्हेंबर – ६ डिसेंबर २०२५)

करमसद ते केवडिया (Statue of Unity) या मार्गावर १५२ किमी लांबीची राष्ट्रीय पदयात्रा आयोजित केली जाईल. मार्गातील गावांमध्ये सामाजिक विकास कार्यक्रम, विकसित भारत प्रदर्शन, आणि “सरदार गाथा” सांस्कृतिक सत्र सादर केले जातील.


 नोंदणी प्रक्रिया :

या ऐतिहासिक उपक्रमासाठी सर्व इच्छुकांनी माझे भारत पोर्टल https://mybharat.gov.in/pages/unity_march येथे नोंदणी करावी. देशभरातील तरुणांना या एकता यात्रेत सहभागी होऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात आपला वाटा उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन “एक भारत, श्रेष्ठ भारत” या ध्येयासाठी एकत्र येऊ या, असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.