शिक्षणसेवक जिवंत असताना दुर्लक्षित...मृत्यूनंतरही कोणी वाली नाही

सरकारी सेवेत असूनही बेवारस ? | शिक्षणसेवकांच्या कुटुंबाला न्याय कधी
Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 06, 2026 16:11 PM
views 63  views

देवगड : देवगड तालुक्यातील महाळुंगे राणेवाडी (ता. देवगड) येथील शाळेत कार्यरत असलेले तांबे हे अत्यंत प्रामाणिक, साधे आणि प्रेमळ स्वभावाचे शिक्षक होते. त्यांचा जीवनप्रवास हा केवळ नोकरीचा नव्हता, तर तो होता संघर्ष, जबाबदारी आणि त्यागाचा प्रवास. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयनल (ता. कणकवली) येथील 38 वर्षीय शिक्षणसेवक प्रशांत गंगाराम तांबे यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण शिक्षकवर्ग आणि समाज हळहळ व्यक्त करत आहेत. जवळपास १४ वर्षे त्यांनी नोकरीसाठी संघर्ष केला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची वडील पॅरालिसिसमुळे अंथरुणाला खिळलेले, आई सतत आजारी आणि दवाखान्यात, तर पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कपड्यांच्या दुकानात काम करणारी.अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मिळालेली शिक्षकाची नोकरी ही त्यांच्या आयुष्यातील मोठी जिद्द आणि यश होती. मात्र, नियतीने निर्दयी खेळ खेळला…28 मार्च रोजी ओरोस येथे झालेल्या शैक्षणिक महोत्सवातून परतल्यानंतर त्यांना ताप आणि चक्कर येऊ लागली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्लेटलेट्स कमी झाल्याचे निदान झाले. आर्थिक अडचणीमुळे सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. पुढील उपचारासाठी गोवा येथे नेत असताना, 4 एप्रिल रोजी दुपारी ॲम्बुलन्समध्येच त्यांचा मृत्यू झाला…

ही केवळ एका व्यक्तीची मृत्यूकथा नाही…ही आहे व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेची वेदनादायक कहाणी.  शिक्षणसेवक म्हणून काम करत असताना त्यांना केवळ ₹15,799 इतके मानधन मिळत होते. अजून एक वर्ष पूर्ण झाले असते, तर त्यांना नियमित सेवेत प्रवेश मिळाला असता. मात्र, या शिक्षणसेवक काळात ना कोणतेही सेवा संरक्षण, ना शासनाची मदत, ना कुटुंबाला अनुकंपा नोकरी…आज त्यांच्या पश्चात पत्नी, आजारी आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार उघड्यावर आला आहे.विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणसेवकांच्या मृत्यूची ही पाचवी घटना आहे. तरीही शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही, ही वस्तुस्थिती अधिक वेदनादायक आहे.

शिक्षणसेवक हा शिक्षकच आहे, मग त्याच्यावर वेगळी वागणूक का? आज प्रशांत तांबे यांच्यासारखा प्रामाणिक शिक्षक आपल्यातून निघून जातो, पण त्याच्या कुटुंबासाठी शासनाकडे कोणतीच ठोस तरतूद नाही, ही अत्यंत वेदनादायक आणि अन्यायकारक बाब आहे. सरकारी सेवेत काम करूनही जर एका शिक्षकाच्या कुटुंबाला ना आर्थिक संरक्षण, ना अनुकंपा नोकरी मिळत असेल, तर ही केवळ व्यवस्थेची चूक नसून ती संवेदनशून्यता आहे.

शिक्षणसेवक ही संकल्पना आता संपवण्याची वेळ आली आहे. शिक्षकांना तात्काळ पूर्ण हक्क, किमान वेतन आणि सेवा संरक्षण देणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडत राहतील आणि आपण फक्त शोक व्यक्त करत राहू. शासनाने आता तरी जागे होऊन ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा. जावेद तांबोळी यांनी व्यक्त केली.