
सावंतवाडी : हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सन 2025 अंतर्गत अ वर्गातील चौथ्या टप्प्यातील सावंतवाडी बस स्थानकाचे मूल्यांकन सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक प्रदेश समितीने शनिवारी केले. या समितीचे पदाधिकारी नाशिक प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते व वरिष्ठ संख्याकी अधिकारी राकेश पवार तसेच समितीमध्ये पत्रकार उमेश सावंत, महिला प्रवासी तृप्ती मालविया यांनी बस स्थानकाच्या सुविधा, कार्यालय आदींची पाहणी करून मूल्यांकन सर्वेक्षण केले.
यामध्ये बस स्थानक मध्ये प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष, प्लॅटफॉर्म स्वच्छता, तिकीट व पास आरक्षण केंद्र, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, इमारतीची स्वच्छता व डागडुजी, बस स्थानक सुशोभीकरण,जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक, प्रवाशांना भेडसावणाऱ्या तक्रारी,चालक, वाहक यांचे गणवेश, महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे विश्रांती गृह, लेखा विभाग कार्यालय, वर्कशॉप, एसटी बसची स्वच्छता, आदी ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करून समितीने मूल्यांकन करून गुण दिले आहेत. याचा अहवाल समितीमार्फत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाच्या मुंबई मुख्य कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. राज्यातील सर्व अ वर्गातील बसस्थानकांचे मूल्यांकन सर्वेक्षण अन्य समिती कडून कार्यालयात दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवर याचा निकाल जाहीर होणार आहे, असे समितीचे पदाधिकारी विजय गीते यांनी स्पष्ट केले.
गीते म्हणाले, नाशिक प्रदेश समितीमार्फत मुंबई प्रदेशातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील अ वर्गातील 18 बस स्थानकांचे चौथ्या टप्प्यातील मूल्यांकन सर्वेक्षण करण्यात आले. या 2025 अभियान यापूर्वी पहिले दुसरे व तिसरे असे तीन टप्प्यात मूल्यांकन सर्वेक्षण झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ व सावंतवाडी ही दोन वर्गातील बस स्थानके आहेत. समितीने केलेल्या सर्वेक्षणात समाधान व्यक्त केले.
समितीचे पदाधिकारी विजय गीते, राकेश पवार, पत्रकार उमेश सावंत, प्रवासी तृप्ती मालविया यांचे आगार व्यवस्थापक निलेश गावित यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी वाहतूक निरीक्षक सौ प्रांजल धुरी, वाहतूक निरीक्षक रेषा सावंत, वाहतूक निरीक्षक किशोर यादव, लेखा विभागाचे अरुण पवार उपस्थित होते.










