
सावंतवाडी : शहरातील एमएनजीएल कंपनीमार्फत चालू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामाबाबतचा आढावा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी घेतला. काम योग्य रीतीने करत पावसापूर्वी पूर्ण करावे, नागरीकांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
शहरातील सर्वोदयनगर, गणेश नगर व शिरोडा नाका या भागातील कामाची पाहणी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी कंपनीमार्फत काम करणारे कंत्राटदार व नगरपरिषद अधिकारी यांना या कामाबाबत नगराध्यक्षांकडून सुचना देण्यात आल्या. हे काम योग्य रीतीने करण्यात यावे, कोणत्याही प्रकारचा त्रास शहरातील नागरीकांना होता नये याची दक्षता घेण्यात यावी अशा सुचना नगराध्यक्षांनी दिल्या. तसेच परिसरातील नागरिकांच्या तक्रारी नुसार गटार व नाल्यांची तात्काळ सफाई करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. शिरोडा नाका परीसरात अनधिकृत फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्याला अधिकृत परवाना असल्याशिवाय फळविक्री करून नये अशा सुचना नगराध्यक्षांनी दिल्या. यावेळी नगरसेविका निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, अभियंता आकाश शिंदे, संदेश पाटील, सुरज पाटील, आदींसह न.प.चे अधिकरी, कर्मचारी उपस्थित होते.










