
दोडामार्ग : बाहुबली टस्कर हत्ती सोमवारी सकाळच्या सुमारास मोर्ले येथील मुख्य रस्त्यावर अचानक दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावर थेट हत्तीसमोर उभे ठाकल्याने ग्रामस्थ, वाहनचालक आणि शालेय विद्यार्थ्यांची काही काळ अक्षरशः घाबरगुंडी उडाली. मात्र काही वेळात तो जंगलात निघून गेल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मोर्ले परिसरात सध्या पाच हत्तींचा कळप वावरत असल्याची माहिती आहे. मात्र ‘बाहुबली’ हा या कळपापासून अलग झालेला असून तो एकटाच मुक्तपणे फिरत आहे. सोमवारी सकाळी अचानक तो मुख्य रस्त्यावर आला आणि काही काळ तिथेच थांबल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. कामानिमित्त बाहेर पडलेले ग्रामस्थ, दुचाकीस्वार आणि शालेय विद्यार्थी यांना हा प्रसंग अनपेक्षितपणे समोर आला. काहींनी तातडीने मागे वळण्याचा मार्ग निवडला, तर काहींनी सुरक्षित अंतर राखत थांबणे पसंत केले. या काळात रस्त्यावर वाहतूकही काही प्रमाणात ठप्प झाली होती.
‘बाहुबली’चा वावर शांत असला तरी त्याच्या हालचालींमध्ये अनिश्चितता जाणवत होती. त्यामुळे कोणीही त्याच्याजवळ जाण्याचे धाडस केले नाही. स्थानिकांनी सावधगिरी बाळगत दूरूनच परिस्थितीवर लक्ष ठेवले. काही वेळानंतर हा टस्कर हळूहळू जंगलाच्या दिशेने वळला आणि निघून गेला. सध्या काजूच्या हंगाम सुरू असून शेतकरी काजू बागेत व्यस्त आहे. त्यामुळे या हत्तींना पिटाळून लावण्याची मागणी जोर धरत आहे.










