दोडामार्ग विजघर राज्यमार्ग कामाबाबत गुप्त बैठकीवरून संताप

रस्ता कामावरही प्रश्नचिन्ह | तहसीलदारांच्या दालनातील बैठकीच्या निर्णयाकडे सामान्य जनतेचे लक्ष
Edited by: लवू परब
Published on: April 06, 2026 18:54 PM
views 120  views

दोडामार्ग : दोडामार्ग ते विजघर या नव्याने सुरु असलेल्या राज्यमार्गाच्या कामासंदर्भात तहसीलदारांच्या दालनात सोमवारी ठेकेदार व सत्ताधारी यांची गुप्त बैठक पार पडल्याने विविध प्रश्न उपस्थित होत असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीला केवळ जिल्हा परिषद (जि.प.) व पंचायत समिती (पं.स.) सदस्यांनाच निमंत्रण दिले असताना सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थिती लावल्याची माहिती पुढे येतं असून याउलट विरोधक, आणि ज्या गावांतून रस्त्या जात आहे त्या लगतच्या गावांचे सरपंच, जागरूक नागरिक आणि पत्रकारांना दूर ठेवण्यात आल्याने या बैठकीमागील नेमके उद्दिष्ट काय, याबाबतही आता संशय व्यक्त केला जात आहे. या बैठकीत सर्वसामान्यांच्या समस्या मांडल्या गेल्या की वैयक्तिक फायद्यासाठी चर्चा झाली, असा सवाल यनिमित्ताने उपस्थित होत आहे. तर झालेल्या बैठकीत नेमके काय निर्णय झाले, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, दोडामार्ग ते विजघर राज्यमार्गाचे रुंदीकरणासह नूतनीकरण काँक्रीटीकरणाचे काम सुरू असले तरी त्याबाबत प्रशासन व सत्ताधारी यांच्याशिवाय इतर सर्वजण अनभिज्ञ असल्याची भावना व्यक्त होत आहे. काम नियमांनुसार होत नसून, सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे आरोप होत आहेत. काम सुरू झाल्यापासून अपघातांची मालिका सुरू झाली असून एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे.

याशिवाय, ठेकेदारांकडून दर्जाहीन काम होत असल्याचा आरोप विरोधक, ग्रामस्थ व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. असे असताना ज्यांचे आरोप आहेत, ज्या जनतेला खरा त्रास होतोय त्या साऱ्यांना अंधारात ठेऊन प्रशासनाच्या साक्षीने झालेल्या या बैठकितून नेमकं काय साध्य झालं. हे सुद्धा जनतेला कळणे आवश्यक आहे. याचं रस्त्यावरून विरोधक आक्रमक झालेनंतर सत्ताधारी शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी पत्रकार परिषदेत सर्व संबंधितांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिने उलटूनही ती बैठक झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

याचं पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी सोमवारी तातडीने बैठक बोलावली. मात्र या बैठकीत केवळ जि.प. व पं.स. सदस्यांनाच निमंत्रीत करण्यात आले होते. मात्र अनेक सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा या बैठकीत सहभागी करून घेतले गेले. बैठकीची माहिती मिळाल्यानंतर काही सरपंच उपस्थित राहण्यासाठी आले असता त्यांनाही प्रवेश नाकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या बैठकीत एकाही विरोधी पक्षाच्या प्रतिनिधीचा सहभाग नसल्याने त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले की काय अशी चर्चाही आता बैठकी नंतर सुरू झाली आहे.

खरं तर हा मार्ग विजघर, मुळस- हेवाळे, मेढे, पाळये, तिलारी, कोनाळ, वायंगणतड, साटेली-भेडशी, झरेबांबर, झरे-१ व २, आंबेली,  आदी गावांमधून तसेच दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतून जातो. त्यामुळे या सर्व भागातील नागरिकांना आणि वाहन चालकाना या कामाचा थेट परिणाम सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम सात मीटर रुंदीसह व दोन्ही बाजूंना दीड मीटर बाजूपट्टी असे मंजूर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मार्गालगतची जीर्ण झाडे न हटवताच जशी जागा मिळेल तसं काम पुढे रेटून नेण्यात येतं आहे. त्यामुळे नियमानुसार काम पूर्ण होणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. साटेली-भेडशी व दोडामार्ग या दोन प्रमुख बाजारपेठांमधून रस्ता कसा काढला जाणार, याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी निवेदन देऊन माहिती देण्याची मागणी केली असली तरी अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

सध्या अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल का, तसेच भविष्यात झाडे पडणे किंवा असुरक्षिततेमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. मात्र प्रशासन अशी बैठक घेऊन काय साध्य करू पाहातंय यांचा खुलासा होणेही आवश्यक असल्याची मागणी आता विरोधी पक्षातील पदाधिकारी करू लागले आहेत. 

खरे तर पुढील किमान २५ - ५० वर्षांचा विचार करून अशा राज्य मार्गांचं नूतनीकरण होतं असतं. कोणत्याही भागाचा विकास व्हायचा असेल तर त्यासाठी दर्जेदार रस्ते हवेचं. आणि त्याला स्थानिकांनी सहकार्य केलंच पाहिजे. पण ज्या उद्देशाने अनेकांचं नुकसानी करून असा महत्वकांक्षी प्रकल्प पुढे जातं असेल आणि त्या उद्देशानाच हरताळ फासला जातं असेल तर कोट्यावधी निधी खर्च करून उपयोग काय.

सर्वात महत्वाचं राज्यमार्ग दर्जा सुधारणा होतं असताना या मार्गाचे नियमानुसार रुंदीकरण होणे आवश्यकचं आहे, धोकादायक वळणे हटविणे, ज्या भागात तिलारी नदीचे पुराचे वेळी पाणी साचते तिथे रस्त्याची आवश्यक उंची वाढविणे, या मार्गांवरील जुन्या आणि अरुंद पुलांच्या जागी नवीन पूल बांधणे, वळणे हटविणे, धोकादायक झाडे हटवून रस्ता निर्धोक करणे, नियमानुसार साईडपट्टी आणि सुयोग्य गटार व्यवस्थापन आणि सर्वात महत्वाचे रस्ता पुर्ण होईपर्यंत पर्यायी ६ मीटर रस्ता उपलब्ध करणे या गोष्टी ठेकेदार कंपनी कडून शासन आणि राज्यकर्ते सत्ताधारी पक्ष् आणि लोकप्रतिनिधी यांनी करून घेणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवानं असे न व्हता ठेकेदार कंपनी रस्त्याचे काम पुढे रेटून नेत आपलं बिलं काढून घेण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा बैठका घेताना व्यवस्थित नियोजन करून त्या जनतेसमोर उघड करणे आवश्यक असल्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होतं आहे.

सर्व जबाबदारी प्रशासन व सत्ताधारी घेणार का?

रस्त्याचे काम काॅंक्रिटीकरणाचे असून सात मीटर रुंद व दोन्ही बाजूला दीड मीटर बाजूपट्टी असे मंजूर काम असल्याचे शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र मार्गाला लागून असलेली जीर्ण झाडे तशीच उभी आहेत. ती जर हटवली नाहीत तर नियमानुसार रस्त्याचे काम पूर्ण होणे अशक्य आहे. शिवाय या मार्गावर साटेली -भेडशी व दोडामार्ग या दोन प्रमुख बाजारपेठा आहेत. या बाजारपेठेतून रस्ता कसा होणार? याची माहिती ग्रामस्थांना द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे यापूर्वी साटेली -भेडशी ग्रा.पं. सदस्य व माजी उपसरपंच गणपत डांगी यांनी केली होती. याचे अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला असून अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत रस्त्याचे किती काम होणार? झाडे पडून, गटार व्यवस्थापन अभावी, पर्यायी रस्ता असुरक्षिततेमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी हे सत्ताधारी व प्रशासन घेणार का? असे संतप्त सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहेत.