निर्धार 'मताधिक्याचं गाव'

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 11, 2024 10:50 AM
views 359  views

कणकवली : शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातुन झालेली प्रमुख विकास कामे ही लोकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने कणकवली विधानसभा मतदार संघात शिवसेना व युवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने “निर्धार मताधिक्याचे आणि गाव दौरा सुसंवादाचा ” अभियान उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील लोकांपर्यंत खासदार विनायक राऊत यांनी केलेली विकास कामे पोहोचवली जातील , अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी येथे दिली.

तसेच भाजप पक्षात नारायण राणे व नितेश राणे यांची पत असेल तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात त्यांनी भाजपचा कमळ निशाणीवर उमेदवार द्यावा. त्या उमेदवाराचा पराभव करत २ लाखाच्या मताधिक्क्याने खासदार विनायक राऊत पुन्हा विजयी होतील. खासदार राऊत हे आपल्या भुमिकेवर कायमच ठाम राहिले आहेत. मात्र, नितेश राणेंनी नाणारच्या विरोधात विजयदुर्ग,रामेश्वर येथे घंटानाद केला. प्रारंभी प्रकल्पाला विरोध दर्शविला. पण त्यांची आता नाणार समर्थनार्थ भूमिका असल्याचा टोला सुशांत नाईक यांनी यावेळी लगावला.

कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना देवगड तालुकाप्रमुख जयेश नर, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, फरीद काझी, जिल्हासमन्वयक राजू राठोड,समन्वयक तेजस राणे, गुरू पेडणेकर, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, प्रकाश वाघेरकर, सचिन पवार, कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, प्रतिक रासम, चेतन गुरव, विभागप्रमुख सिद्धेश राणे, किरण वर्दम, बबन मुणगेकर, सोहम वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. कणकवली विधानसभा मतदार संघात मागच्या निवडणूकीत २८ हजाराचे मताधिक्य नितेश राणेंना होते. आता या लोकसभा निवडणूकीत भाजपचे मताधिक्य तोडून खासदार राऊत यांना गाव दौ-याच्या माध्यमातुन १० हजाराचे मताधिक्य आम्ही मिळवून देणार आहोत. त्यासाठी गावागावात जाऊन ठाकरे शिवसेना बेसिक संघटना व युवासेना पदाधिकारी नागरीकांशी संवाद साधणार आहेत. खासदार राऊत यांनी केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवली जाणार आहेत.

तसेच शिवसेना ठाकरे गट पक्षाचे गावागावात पदाधिकारी निवडले जातील. संघटनात्मक बांधणी या गाव भेट दौ-यातून केली जाणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले. तसेच सी आर्म मशीन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शिवसेनेच्या आंदोलनामुळेच उपलब्ध झाली आहे. त्याचे श्रेय नितेश राणेंनी घेवू नये असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे ९० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. तसेच 90 टक्के प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळवून देण्यात खा. विनायक राऊत यांना यश आले आहे. चिपी विमानतळाचा प्रश्न देखील मार्गी लावला . मराठा आरक्षण, कोकण रेल्वे विद्युतीकरण हे प्रश्न लोकसभेत मांडून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परवानगी मिळवली. ९५० कोटी रुपये खर्चाचे मेडिकल कॉलेज मंजूर झाले आणि ते सुरूही करण्यात आले.

विनाशकारी नाणार, बारसू रिफायनरी प्रकल्प थांबवून कोकण पर्यावरण बचावासाठी लढा दिला. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला घोडगे सोनवडे घाट मार्गासाठी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच मार्गी लागला आहे. आंगणेवाडी येथे धरण प्रकल्पासाठी २२ कोटी धरणासाठी व १३ कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी मंजूर करून घेतले. ग्रामीण भागात बीएसएनएल नेटवर्कची समस्या सोडविण्यासाठी २६० टॉवर मंजूर केले व ६७ टॉवर दृष्टीक्षेपात आहेत. त्यातील बहुतांशी टॉवरची कामे ही पूर्ण होत आलेली आहेत, तर काही कामे सुरु आहेत. किनारपट्टी भागातील वातावरणामुळे विद्युत पोल खराब होण्याची समस्या वर्षानुवर्षे उद्भवते. यावर मात करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी किनारपट्टी भागांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी १७६० कोटी रुपये मंजूर करुन घेतले. सिंधुदुर्गात विशेषतः माणगांव खोरे व दोडामार्ग सावंतवाडी भागात हत्तींमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते यावर मात करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून हत्तीपकड मोहीम राबविण्यात आली. तसेच बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठीही श्री. राऊत यांनी प्रयत्न केले. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील ९० टक्क्याहून अधिक गावांपर्यंत पोहोचणारे एकमेव खा. विनायक राऊत आहेत. समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट ऊंच कोचरी माचाळ गावात मुख्यमंत्री सडक योजनेतून ७.४१ कोटींचा निधी खर्चुन रस्ता पूर्णत्वास नेला. ही कामे पुर्ण करणारा शिवसेनेचाच खासदार असल्याचे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगितले.