
सभापतींच्या वाहन, रिक्तपद, आरोग्य समस्यांवर सदस्य आक्रमक
सावंतवाडी : स्मार्ट मीटरच्या नेटवर्क अभावी शून्य रिडिंग पडलेल्या तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या नळ योजनेचे बिल विज वितरणकडून तब्बल ८० हजार रुपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी आज सभागृहासमोर उघड केला. माझे फिल्ड सुद्धा इलेक्ट्रिक आहे. त्यामुळे उगाचच आम्हाला बोलायला भाग पाडू नका, या प्रश्नावर वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय घ्या. अन्यथा, यापुढे असे प्रकार आम्ही सहन करणार नाही असा इशारांच त्याने वीज वितरणचे उपअभियंता श्री. राक्षे यांना दिला. तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या विजेच्या प्रश्नावर योग्य नियोजन करून त्या-त्या भागातील कामे आत्ताच मार्गी लावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. तसेच वन विभागाचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहील्याने नाराजी व्यक्त केली. बाकीचे अधिकारी रिकामटेकडे म्हणून बैठकीला येतात का ? असा संतप्त सवाल केला.
सावंतवाडी तालुका पंचायत समितीची मासिक बैठक आज सभापती सुस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपसभापती गौरव मुळीक, प्रभारी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदी उपस्थित होते. या बैठकीस सर्व सदस्यांनी हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या विभागवार आढाव्यामध्ये उपस्थित पंचायत समिती सदस्यांनी अधिकारी वर्गांना अनेक मुद्द्यावरून कात्रित पकडले. सावंतवाडी पंचायत समितीला दोन विस्तार अधिकारी पदे मंजूर असताना त्यातील एक विस्तार अधिकारी पद हे रिक्त झाले आहे. मात्र, अन्य एका पदावरील अधिकारी प्रतिनियुक्तीने अन्य जिल्ह्यात काम करत आहे. परंतु, पगार त्यांना या ठिकाणचा मिळत आहे. मात्र, या ठिकाणच्या कामाचा लोड अन्य कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून एकतर त्या पदावरील व्यक्तीची रितसर बदली करा आणि त्या रिक्त जागेवर नव्याने अधिकारी येण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा अशी मागणी केली. यावेळी सर्वच सदस्यांनी या विषयाला उचलून धरत तशा प्रकारचा ठरावच सभागृहात मांडला. तो सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. या संदर्भात आपण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पालकमंत्री यांचे लक्ष वेधले आहे. तशा प्रकारचा पत्रव्यवहारही आपण त्यांच्याकडे केला आहे. मात्र, उत्तर न आल्याने आपल शिष्टमंडळ घेऊन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊ असे उपसभापती श्री. मुळीक यांनी सभागृहात सांगितले.
अन्यथा, उपोषणाला बसणार : मायकल डिसोजा
दरम्यान, सावंतवाडी तालुक्यात 11 माकड्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र, माकड तापाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आरोग्य विभागाकडून घेण्यात आली आहे. माकड तापाचे ५ रुग्ण मिळाले होते, त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले असून ते आता ठीक असल्याचे तसेच टीबी व इतर रूग्णांच्या उपचाराबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आंबोली येथे अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अडचण निर्माण होते. त्यामुळे त्या ठिकाणी सफाई कामगारांची रिक्त पदे भरा. तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगूनही वैद्यकीय अधिकारी बदली केल्याने त्या ठिकाणचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी हे एमबीबीएस द्या. अन्यथा, आम्हाला उपोषणासारखा मार्ग हाती घ्यावा लागेल असा इशारा सदस्य मायकल डिसोजा यांनी दिला. तर औषधांच्या तुटवड्याबाबत उपसभापती श्री. मुळीक यांनी नाराजी व्यक्त करत सुचना दिल्या.
सार्वजनिक बांधकामला सूचना
तसेच न्हावेली गावासाठी स्मशानभूमीकडे रस्ता नसल्याने अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा त्या ठिकाणी नेमके काय अडचणी आहेत ते शोधा अशा सूचना सदस्य शरद धाऊसकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तर सोनुर्ली आरोस तिठ्यावर गतिरोधक नसल्याने अपघातासारखे प्रकार घडत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गतिरोधकाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी पावले उचला अशी मागणी त्यांनी केली. तर केसरी बंधारा या कामावरून सदस्य प्रशांत सुकी जलसंधारणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वेत्ये ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सेवेत असताना मालवणला खाजगी कामासाठी गेल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये आलेल्या गावातील अनेक ग्रामस्थांना परतून जावे लागले. याबाबत सदस्य जितेंद्र गावकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत संबंधित ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजवा अशी मागणी केली. तर मळगाव घाटी मध्ये रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वनभागाच्या धोकादायक झाडामुळे पावसाळ्यात अपघाताला निमंत्रण असते. यामुळे एखाद्याच्या जीव केल्यास याला सर्वस्वी जबाबदार वनविभाग राहील. त्यामुळे सदरची झाडे तोडण्याबाबत पंचायत समिती स्तरावरून पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी ही त्यांनी केली. तसेच धनश्री मराठे यांनी देखील मळेवाड येथील समस्यांकडे सार्वजनिक बांधकामचे लक्ष वेधले.
मल्टिस्पेशालीटीचा मुद्दा उपस्थित !
दरम्यान, आरोग्याच्या प्रश्नावर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागे संदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. आमदार केसरकर यांनी यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मल्टीस्पेशालिटीची अत्यंत गरज असून वेत्ये या ठिकाणी असलेल्या जागेचा पुनश्च एकदा विचार करण्यात यावा. आम्ही विना मोबदला जागा देण्यास तयार असल्याचे श्री. गावकर यांनी यावेळी सांगितले. हे हॉस्पिटल सावंतवाडी, वेत्ये, आंबोलीत हव तिथे करा. पण ते एकदा पूर्ण करा. उपजिल्हा रुग्णालयात अपघाताचे रूग्ण मलमपट्टी करून गोव्याला पाठवले जातात. जागे अभावी हॉस्पिटल सावंतवाडीत होत नसेल तरी वेत्येत विनामोबदला जागा देतो. यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्या संमतीने यावर निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. तर ही सुचना घेऊन माहिती घेऊन पुढील बैठकीत त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेऊ अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच श्री. सुकी यांनी दाणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मुद्दा उपस्थित केला.
बाकीचे अधिकारी रिकामटेकडे आहेत का ? : उपसभापती
दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाच काम आहेत का ? बाकीचे अधिकारी रिकामटेकडे आहेत का ? असा सवाल उपसभापती गौरव मुळीक यांनी उपस्थित करत पं.स. मासिक सभेला अधिकारी उपस्थित न राहिल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच वन विभागाने झाडे तोड्याल्याचा मुद्दा यावेळी सभागृहात गाजला. माझ्या पत्राला वन विभागाने शहरातील मुद्दा असल्याने मुख्याधिकारी यांना कळवून झाडे तोडण्यात आल्याचे उत्तर दिले. ही बाब योग्य नसून उत्तर द्यावी लागतील म्हणून वन विभागाने बैठकीकडे पाठ फिरवल्याचा आरोप उपसभापती श्री. मुळीक यांनी केला. तर सदस्य श्री. गांवकर यांनी सामान्य लोकांना वन विभाग त्रास देते. त्यामुळे या वृक्षतोडीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारावा. ते बैठकीला उपस्थित राहणार नसतील तर आपण त्यांच्या कार्यालयाला धडक देऊ असा इशारा यांनी दिला.
सभापतींना वाहन नसल्याने नाराजी
सभापती सुस्मिता जाधव यांना वाहन उपलब्ध नसल्याची नाराजी सदस्य जितेंद्र गावकर यानी सभागृहात व्यक्त केली. महिला सदस्यांनी देखील सभापती महिला असल्याने रात्री अपरात्री गैरसोय होत असल्याचे मांडले. यावेळी गटविकास अधिकारी यांनी वाहनाची नोंदणी झाली असून लवकरच ते आपल्या सेवेत येईल, त्याचा ताबा आपल्याला मिळेल. वाहन मिळाल्यानंतर चालकाचा विषय येत असून तो विषय देखील जिल्हा पातळीवर घेण्यात आला आहे. लवकरच दोन्ही प्रश्न सुटतील असेही ते म्हणाले. प्रसंगी मी खाजगी वाहनाने प्रवास करतो असंही ते म्हणाले. यावर सभापती सुस्मिता जाधव यांनी नवं वाहन येईपर्यंत आपण समायोजन करू असे सांगितले.
पंपावर अख्ख्या गावाची लाईट वापरली जाते का ?
सभेच्या सुरुवातीलाच नळ योजनेसाठी ग्रामपंचायतीत बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरच्या दुप्पट बीलांवरून उपसभापती गौरव मुळीक यांनी आक्रमक पवित्रा घेतला. स्मार्ट मीटर फेल गेल्याचे चित्र ६३ ग्रामपंचायतीत दिसत आहेत. पंपावर अख्या गावाची लाईट वापरली जाते का ? असा सवाल उपसभापती गौरव मुळीक यांनी केला. महावितरणच्या कारभारावरून पं.स.सदस्यांसह उपसभापतींनीही आक्रमक पवित्रा घेतला. ५ हजार बील येत तिथे ६५ हजार आल, ६३ ग्रामपंचायतींचा हा विषय आहे. स्मार्ट मीटर फेल गेल्याचे चित्र दिसत आहेत. पंपावर अख्या गावाची लाईट वापरली जाते का ? सक्ती करून तुम्ही मीटर लावलेत. मात्र, त्याला नेटवर्कच नाही तर ते मीटर काम कसे करणार ? असा सवाल उपसभापतींनी केला. यावेळी श्री. राक्षे यांनी याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधतो असे आश्वासन दिले. तर उप अभियंता सभागृहात खोटी माहिती देतात. त्यामुळे तालुक्यात कुठे काम सुरू आहे ती माहिती द्या, पावसात लाईट गेली तर तुम्हाला कोंडून ठेवणार असा इशारा पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी दिला. तर शहरात काम सूरू आहे मग, ग्रामीण भागातील लाईट का जाते ? असा सवाल सदस्य प्रशांत सुकी यांनी केला. तसेच धनश्री मराठे यांनी देखील मळेवाड येथील विद्युत पुरवठा खंडित होण्यावरून जाब विचारला. तसेच प्राजक्ता केळुसकर, महेश धुरी, उदय पारिपत्ये, शरद धाऊसकर, मायकल डिसोजा, प्रथमेश सावंत आदींनी देखील ग्रामीण भागातील वीज समस्यांवरून उप अभियंतांना धारेवर धरले. यावेळी पोल बदलण्याचे काम सुरू आहे. अतिरिक्त पोलची मागणी आम्ही केली आहे. २५० पोल सावंतवाडीत येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी हे पोल बसविण्यात येथील असे उपअभियंता श्री. राक्षे यांनी सांगितले. ग्रामीण भागात लो व्होल्टेजचा प्रोब्लेम राहत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपसभापती यांनी विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारावरून दीड महिन्यात ३३ केव्ही, ११ केव्हीच काम पूर्णत्वास आणा असे निर्देश दिले. तसेच आतापर्यंत तालुक्यात नव्याने बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरबाबत माहिती द्या असेही सांगितले. ग्रामपंचायतीना येणाऱ्या अतिरिक्त बीलांबाबत उपाययोजना करण्याची सुचना गटविकास अधिकारी श्री. नाईक यांनी महावितरणला दिली.
यावेळी सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सदस्य जितेंद्र गावकर, प्रशांत सुकी, मायकल डिसोजा, उदय पारिपत्ये, शरद धाऊसकर, महेश धुरी, प्रथमेश सावंत, धनश्री मराठे, प्राजक्ता केळुसकर, अवनी राऊळ, प्रणाली टिळवे, नेहा कांबळी, उत्कर्षा गांवकर, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई आदींसह पंचायत समिती सदस्य, विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.










