
सावंतवाडी : सावंतवाडी - तळकट- पणतुर्ती -दोडामार्ग सकाळची बस सेवा पूर्ववत करा. अन्यथा, रस्ता बंद करू असा इशारा तळकट ग्रामस्थांनी दिला. ही बससेवा शालेय काळासाठी होती त्यामुळे बंद केली होती. उद्यापासून ती पुर्ववत केली जाईल असे आश्वासन स्थानक प्रमुख राजाराम राऊळ यांनी दिली.
याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी परिवहन विभागाच्या स्थानक प्रमुखांना दिले. या निवेदनात, सकाळी ७:१५ वाजता सावंतवाडीहून तळकट-पणतुर्ती -दोडामार्गकडे जाणारी बस सेवा बंद असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.ही बस सेवा अनेक प्रवाशांसाठी अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी (ज्यांच्याकडे प्रवास पास आहेत), ज्येष्ठ नागरिक, नोकरीसाठी जाणारे कर्मचारी, तसेच वैद्यकीय सेवा व बाजारपेठेसाठी प्रवास करणारे इतर नागरीक यांच्याकरिता ही सेवा बंद झाल्यास त्यांचे दैनंदिन जीवन व शिक्षणावर मोठा परिणाम होईल. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ह्या परीसरातील लोकांना ही एकच गाडी आहे. ही बस सेवा जनहितार्थ पूर्ववत सुरू ठेवावी. असे न केल्यास पूर्वकल्पना न देता परिसरातील सर्व सरपंच, सर्व ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
दरम्यान, स्थानक प्रमुख श्री. राऊळ यांनी ही सेवा शाळेसाठी सुरू असल्याने बंद करण्यात आली होती. मात्र, उद्यापासून ती पुर्ववत केली जाईल. शाळा सुरू होईपर्यंत सकाळी पावणे सात वाजेपर्यंत ती स्थानकातून सुटेल असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच सुरेंद्र सावंत, उपसरपंच रमाकांत गवस, सदस्य शशिकांत राऊळ, अंकुश वेटे, मनोहर झेंडे, मनोज सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.