मुंबई - गोवा महामार्गावरील समस्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 23, 2024 05:51 AM
views 184  views

कणकवली : जानवली येथे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराने भरपाई द्या, तसेच प्रलंबीत असलेल्या विविध १७ समस्या मार्गी लावा, अशी मागणी जानवली ग्रामस्थांनी केली. बहुतांशी मागण्यांबाबत उप अभियंता अतुल शिवणीवार यांनी हे अधिकार कार्यकारी अभियंत्यांना असल्याचे सांगितल्यानंतर मग बैठकीचा उद्देशच काय? असा सवाल करत ग्रामस्थ आक्रमक झाले. तसेच पुन्हा अपघात झाला तर हायवे बंद करू असा इशारा दिला. त्यानंतर भरपाईबाबत ठेकेदार व महामार्ग प्राधिकारणला तातडीने कळवितो, असे श्री. शिवणीवार यांनी सांगितले. तर उर्वरीत मागण्यांची पुर्तता लवकरात लवकर करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी मोबाईवर दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. तर अपघातास कारणीभूत कार दोन दिवसांत ताब्यात घेण्यात येईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी यावेळी दिले.

जानवली येथे झालेल्या रास्तारोकोवेळी तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार येथील तहसिलदार कार्यालयात श्री. देशपांडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवणीवार, पोलीस निरीक्षक समेशर तडवी, दामू सावंत, सुदीप कांबळे, श्रद्धा कदम, मनोहर पालयेकर, श्री. दळवी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातीलाच अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. कारण हा अपघात महामार्ग प्राधिकरण व ठेकेदाराच्या चुकीमुळे झालेला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे याला ठेकेदार व प्राधिकरणच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यावर श्री. शिवणीवार यांनी याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पत्र पाठवतो व पाठपुरावा करतो, असे सांगितले.

यावेळी सावडाव ते जानवलीपर्यंत सुमारे ६.५ कि.मी. रस्त्याला अधिकृत सर्कल नाही. त्यामुळे मिडलकट ठेवलेले आहेत. गतवर्षी आम्ही सर्कलची मागणी केली. त्याबाबत पत्रव्यवहार झाला पण पुढे काहीच झाले नाही, याकडे रंजन राणे यांनी लक्ष वेधले. या चुकीमुळे आतापर्यंत २७ अपघात झाले असल्याचे ते म्हणाले. त्यावर कार्यकारी अभियंत्याकडून पुढील कार्यवाही झाली नसल्याचे श्री. शिवणीवार यांनी सांगितले. तसेच अनधिकृत मिडल कटच्या ठिकाणी रम्बलर लाऊ शकत नसल्याचे सांगितले. यानंतर ग्रामस्थांनी श्री. शिवणीवार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत तुमच्या हातात काहीच नसेल तर बैठकीला का आला? असा सवाल केला. तसेच प्राधिकरण व ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शाळांजवळ व वस्त्यांजवळ सूचना फलक लावा, रिलॅक्स हॉटेलजवळ गटरची पाईपलाईनसहीत मागण्या करण्यात आल्या. मात्र, उपअभियंत्यांकडून थेट आश्वासन मिळत नसल्याने अखेर कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्याशी सपंर्क साधण्यात आला.

जाधव यांच्यासोबत दुरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर शाळा व अपघताच्या ठिकाणी रम्बलर व रिप्लेक्टर लावण्यात येतील, ही कार्यवाही तातडीने होईल. जंक्शन व लोकवस्तीच्या ठिकाणी कॅटआय लावण्यात येईल. आवश्यक ठिकाणी सूचना फलक व दिशादर्शक फलक लावण्यात येतील. तसेच सर्कल व इतर आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने सेप्टी ऑडीट करून घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री. जाधव यांनी दिले. तर रिलॅक्स हॉटेलजवळची पाईपलाईन पावसाळ्यापर्यंत पुर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यावेळी रस्त्याचे पाणी अडविलेले मार्ग मोकळे करण्याचेही आश्वासन देण्यात आले. अपघातग्रस्त कार न सापडल्याप्रकरणी मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सदरची कार दोन दिवसांत आरोपीसह ताब्यात घेण्यात येईल, असे श्री. तडवी यांनी स्पष्ट केले. तरसेच इन्शुरन्स क्लेमसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना ठेकेदाराकडून पाच लाखांप्रमाणे मदत देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास ठेकेदाने जे रॉयल्टी न भरता जे अनधिकृत उत्खनन केले आहे, त्याबाबत गप्प बसणार नाही, असा इशारा देण्यात आला. या बैठकीला ठेकेदाराचे प्रमुख इंजिनिअर आगावू कळवूनही अनुपस्थित होते. ते आपले ऐकत नसल्याचे उपअभियंत्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यामार्फत जी कामे अपुर्ण आहेत, ती पुर्ण करण्याबाबत ते नसताना आपण आश्वासन देऊ शकत नाही, असे श्री. शिवणीवार यांचे म्हणणे होते. तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी ही बैठक आयोजित करून ठेवलेला सकारात्मक दृष्टीकोन. तसेच अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासकीय योजनांमधून मिळणाऱ्या मदतीसाठी तातडीने सुरू केलेल्या कार्यवाहीबाबत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.