
चिपळूण : चिपळूण वनविभागाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या निसर्गविषयक कलादालनाला दिवंगत सर्पमित्र आणि निसर्ग कार्याचे आरंभपुरुष कै. विक्रांत नर यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी चिपळूणमधील मान्यवर सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
कै. विक्रांत नर हे खेंड (ता. चिपळूण) येथील रहिवासी असून सुमारे २८ वर्षांपूर्वी युवकांना सर्पसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविताना सर्पदंशाने त्यांचे निधन झाले. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग कार्यासाठी प्राणांची आहुती देणारे ते पहिले कार्यकर्ते ठरले. त्यावेळी निसर्ग चळवळ प्राथमिक अवस्थेत असताना विक्रांत यांनी कोणताही पाठिंबा नसतानाही अभ्यास, जनजागृती आणि प्रत्यक्ष कार्यक्रमातून सर्पसंरक्षणाचे धडे समाजासमोर ठेवले होते.
निसर्ग कार्यासाठी प्राणार्पण केलेल्या या कार्यकर्त्याच्या बलिदानाचे योग्य स्मरण होणे आवश्यक असून, आजवर त्यांची स्मृती समाजासमोर हवी तशी जागवली गेली नाही, अशी खंत मान्यवरांनी व्यक्त केली आहे. विक्रांत नर यांच्या कुटुंबीयांशीही नंतर निसर्गप्रेमींचा संपर्क तुटल्याने त्यांच्या स्थितीबाबत अनभिज्ञता राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या निसर्ग कलादालनाचे नामकरण “कै. विक्रांत नर कलादालन” असे करावे, अशी मागणी होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम तसेच वन विभागाचे अधिकारी यांनी या मागणीची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लवकरच या संदर्भात निसर्गप्रेमी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि खेंड परिसरातील प्रतिष्ठित मंडळींची एकत्रित बैठक आयोजित केली जाणार असल्याचेही कळते.