मुंडेडोंगरी ते गार्बेजडेपो प्रकल्पाकडे जाणारा रस्ता निर्धोक बनवण्याची मागणी...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 26, 2024 05:13 AM
views 112  views

कणकवली : कणकवली न. प. कडून कचरा प्रकल्पाच्या कामासाठी आणलेल्या मशीनमुळे मुंडेडोंगरी ते गार्बेजडेपो प्रकल्पाकडे जाणारा रस्ता उखडला गेला आहे. गतवर्षीच झालेल्या रस्त्याच्या नूतनीकरणात आता हा रस्ता पूर्णता खड्डेमय स्थितीत आहे. या रस्त्यावरून वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे सदर रस्त्याची नगरपंचायत प्रशासनाने त्वरित डागडुजी करून निर्धोक बनवावा, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी केली.

मुंडेडोंगरी येथील नगरपंचायतीच्या गार्बेज डेपो प्रकल्पांतर्गत कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत न. पं. ला मशिन प्राप्त झाली आहे. गर्बोज प्रकल्पाकडे ही मशिन घेवून जात असताना रस्ता उखडला गेला. परिणामी या रस्त्यावरून वाहन चालवणे धोकादायक बनले आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. ही बाब ग्रामस्थांनी सुशांत नाईक यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सुशांत नाईक यांनी सदर रस्त्याची पाहणी केली. व हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे केली.