ST चालवल्या प्रकरणी वैभव नाईकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Edited by: भरत केसरकर
Published on: October 10, 2023 19:53 PM
views 2118  views

कुडाळ : अनाधिकाराने प्रवाश्यांनी भरलेली एस टी महामंडळाची बस चालवल्या प्रकरणी वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे कुडाळचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केली आहे.

 सोशल मीडिया आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून हाती आलेल्या प्रत्यक्ष पुरावे आणि व्हिडिओच्या अनुषंगाने कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ विभागाच्या बांदा-कुडाळ-बोरीवली या शनयान प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या चालकाच्या जागेवर बसून राज्य परिवहन मंडळाच्या मालकीची बस चालवल्याचे निदर्शनास आलेले आहे.

कुडाळ आगाराची बांदा बोरीवली बसचे लोकार्पण करण्याच्या अतिउत्साहात आमदार वैभव नाईक यांनी वाहन चालवण्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत.

कुडाळ बस स्थानकात बांदा बोरिवली ही प्रवाशांनी भरून आलेली MH14KQ7930 ही एसटी बस स्वतःकडे प्रवासी वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसताना भरधाव वेगाने चालवण्याची चित्रफीत प्रसिद्ध झाली असून त्यांच्या या कृत्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता. तसेच सदर बस चालवत असताना चालक केबिनमध्ये काही कर्मचारी आणि इतर प्रवासी उभे असल्याचे दिसत आहे. या प्रसंगी या एसटी बसचा प्रवासी चढण्याचा दरवाजा देखील उघडा ठेवण्यात आला होता. 

सदरच्या बसेस चालवण्यासाठी कुडाळ तसेच इतर आगारातील चालकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच नवीन प्रकारच्या बसेस चालवण्याचे कौशल्य व प्रशिक्षण त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा प्रवाशी बस चालवण्यासाठी आवश्यक परवाना(लायसन्स) नसताना आमदार वैभव नाईक यांनी हे बेकायदेशीर कृत्य करून प्रवाशांना जीवाला धोका उत्पन्न केला आहे. सदरची बाब अतिशय गंभीर असून प्रवासी यांच्या जीवितास हानी पोहोचवणारी असून सरकारी मालमत्तेला हानी पोचवणारे आहे.. 

त्यामुळे कुडाळ आगाराची एसटी बस चालवल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि त्यांना बस चालवण्यासाठी परवानगी एसटी सिंधुदुर्ग विभागाचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील व विभागीय वाहतूक अधिकारी डॉ.विक्रम देशमुख व इतर अधिकारी यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.