आंबोलीबाबत खोटी बातमी प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Edited by: विनायक गावस
Published on: June 08, 2023 17:37 PM
views 4248  views

सावंतवाडी : आंबोलीची बदनामी होईल अशी खोटी दरोड्याची बातमी प्रसारित करणाऱ्यावरती चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबोली ग्रामपंचायतीने सावंतवाडी पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 'आंबोली घाटात शस्त्रधारी टोळीची दहशत" अशा प्रकारची बातमी प्रासारीत केल्यान वर्षा पर्यटनाच्या तोंडावर आंबोलीची बदनामी झाली आहे. या बातमीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही असं ग्रामपंचायतीच म्हणन आहे.

NTC मिडीया ब्रेकिंग न्यूज या प्रसारमाध्यमाच्यावतीने ०६ जून २०२३ रोजी 'आंबोली घाटात शस्त्रधारी टोळीची दहशत" अशा प्रकारची बातमी प्रासारीत केली आहे. या बातमीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. या बातमीमुळे आंबोलीच्या वर्षा पर्यटनाच्या तोंडावर आंबोलीची बदनामी झाली आहे. त्यामुळे या प्रसार माध्यमाची चौकशी करून जर बातमीबद्दल त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा नसल्यास त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबोली ग्रामपंचायतीने सावंतवाडी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.

तसेच या प्रसार माध्यमाच्या वतीने झालेल्या बदनामी बद्दल प्रत्यक्ष आंबोलीमध्ये उपास्थित राहून त्यांच्या प्रसार माध्यमाच्या वतीने जाहीर माफी मागावी व इतर प्रसार माध्यमामध्ये प्रसिद्ध करावी अशी मागणी केली गेली आहे.