'त्या' शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून वगळण्याची मागणी...!

Edited by: भरत केसरकर
Published on: April 01, 2024 12:10 PM
views 758  views

ठाणे : दिव्यांग शिक्षक, गरोदर महिला व स्तनपान करणाऱ्या माता तसेच  विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्यासाठी शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर घागस सरांच्या मार्गदर्शनाने कोकण विभाग कार्यवाह ज्ञानेश्वर गोसावी, ठाणे महानगर अध्यक्ष किशोर राठोड, उल्हासनगर महानगर अध्यक्ष राजेंद्र गवळी, ठाणे महानगर कार्यवाह अनिल मुरादे, भिवंडी महानगर कार्यवाह योगेश वल्लाळ, कल्याण महानगर कार्यवाह थॉमस शिनगारे यांनी निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले.

ठाणे जिल्ह्यांतर्गत चार लोकसभा मतदार संघात निवडणूक कामाकरीता नियुक्त खाजगी तसेच शासकीय व निमशासकीय शाळांमधील दिव्यांग, दुर्धर आजार असलेले व गरोदर महिला - स्तनपान करणाऱ्या महिला व ५५ वर्षांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विनाअनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर वृंद यांना निवडणूक कर्तव्यातून वगळावे अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली.

५५ वर्षावरील कर्मचारी हे विविध आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांच्यावर निवडणूक कामाचा अतिरिक्त ताण येऊन त्यांना मानसिक व शारीरिक त्रास बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच ही निवडणूक उन्हाळयाच्या दिवसांमध्ये असल्या कारणांमुळे ह्रदयरोग असलेल्या आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना अधिकचा त्रास होऊ शकतो असा धोका देखील चर्चेदरम्यान संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हाधिका-यांच्या नजरेस आणून दिला. निवडणूक आयोगाने सवलत दिलेले तसेच उच्च न्यायालयाने ज्यांना निवडणूक कामकाजाची सक्ती करता येणार नाही अशा कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्याबाबत तालुका स्तरीय क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनात केली आहे.