
सावंतवाडी : स्वच्छतेचे महान पुजारी समाज सुधारक श्री संत गाडगेबाबा यांच्या नावाने संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर व पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे केली. श्री संत गाडगेबाबा महाराज परिट समाज सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी तालुका सेवा संघ यांच्या वतीने रविवारी 23 फेब्रुवारी रोजी श्री संत गाडगेबाबा जयंती सावंतवाडी येथे साजरी करण्यात येत आहे.
श्री. संत गाडगेबाबा महाराज हे स्वच्छतेचे पुरस्कर्ते होते. भजन, किर्तन या माध्यमातून त्यांनी स्वच्छताविषयक समाज सुधारणेचे व्रत स्वीकारले होते. या निमित्त सावंतवाडी येथे साफसफाई करण्याचे योजले असून नगरपरिषदेमार्फत सकाळी मच्छीमार्केट व भाजी मार्केट या ठिकाणी, तसेच संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवून सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या स्वच्छता अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषद शहरात सर्व प्रभागांमध्ये नेहमीच स्वच्छता मोहिम राबवित असते. या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य या संदर्भात जनजागृती करण्यात येते. या स्वच्छता मोहिमेत सर्व शाळा, हायस्कूल, कॉलेज, तसेच सामाजिक संस्था यांना सामावून घ्यावं असं आवाहन श्री. भालेकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी दिलीप भालेकर, राजेंद्र भालेकर, दिपाली भालेकर, अनिता होडावडेकर, अनुजा होडावडेकर, संजय होडावडेकर, प्रदीप भालेकर, दयानंद रेडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.