'तो' जाचक आदेश रद्द करण्याची मागणी

Edited by:
Published on: March 11, 2025 15:16 PM
views 126  views

सिंधुदुर्गनगरी : १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेचा शासन निर्णय लागू झाल्यास शिक्षण क्षेत्रात खळबळ माजणार असल्याने, गोरगरीब व  वंचितांचे शिक्षण बंद करणारा असल्याने असा जाचक आदेश रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्यभर सोमवार दि.१७ मार्च रोजी धरणे आंदोलन छेडणार असून या अनुषंगाने सिंधुदुर्गातही जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन छेडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी सांगितले.

या संचमान्यतेचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात  जाणवणारच आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता ९९४ शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. यामध्ये ६ मुख्याध्यापक, ८२७ पदवीधर तर १६१ उपशिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शिक्षक संख्येचा विचार करता एक तृतीयांश शिक्षक कमी होणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गच्या शिक्षण  क्षेत्रावर फार मोठा विपरीत परिणाम जाणवणार आहे. इयत्ता सहावी व सातवीच्या जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांना शिक्षकच मिळणार नाही. एक ते सातच्या शाळेवर दोन शिक्षक राहणार आहेत. याचा परिणाम फक्त शिक्षकावर नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भावी पिढीवर होणार आहे. त्यामुळे फक्त शिक्षक नाही तर सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांनीही या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री.गवस व श्री.आरोसकर यांज केले आहे.

राज्यभर एकाचवेळी सर्व जिल्ह्यात हे आंदोलन होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये  १७ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने हे आंदोलन छेडले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी म्हटले आहे.