'त्या' ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Edited by: विनायक गावस
Published on: July 04, 2023 13:01 PM
views 468  views

सावंतवाडी : वेंगुर्ले ते बेळगाव ह्या आंतरराज्य मार्गावरील बोर्डीचे पूल ते आंबोली पर्यंतचा रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्याने हा रस्ता करणाऱ्या ठेकेदाराला तत्काळ काळ्या यादीत टाकावे आणि सदर ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी भाजपचे जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे.

बेळगावला जोडणारा या आंतरराज्य मार्गाचे काम बोर्डी पुलापासून आंबोली पर्यंत मे महिन्यात करण्यात आले होते. परंतु हे काम एका प्रतिष्ठित ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे. पहिल्या पावसातच या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. संपूर्ण डांबर वाहून गेले असून रस्त्यावर खडी आल्याने महामार्ग वाहतुकीस धोकादायक झाला आहे. सदर ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करावे आणि त्याचे बिल अदा करण्यात येऊ नये.

अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांना जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर ,माजी नगराध्यक्ष संजू परब,माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी निवेदन देत ही कारवाईची मागणी केली.यावेळी संजू परब व रवींद्र मडगावकर हे चांगलेच आक्रमक झाले होते. या भ्रष्टाचारांमध्ये कोणाकोणाचा हात आहे? ठेकेदार चुकीचे काम करत असेल तर कारवाई का होत नाही? शासनाचा कोट्यावधी रुपयाचा जर निधी फुकट जात असेल तर याला जबाबदार कोण?असा सवाल करत ह्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे.