सिंधुदुर्गनगरी न.पं.मागणीच्या पत्रकारांच्या लक्षवेधी आंदोलनाला उस्फुर्त प्रतिसाद

२६ जानेवारीपर्यत घोषणा करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 27, 2023 19:08 PM
views 143  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची निर्मिती तातडीने करावी या मागणीसाठी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पत्रकार, नागरिक,व्यापारी,उद्योजक, सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २६ जानेवारीपर्यत नगरपंचायत स्थापनेची घोषणा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
     
सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने बुधवारी छेडलेल्या एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. ओरोस, रानबांबुळी आणि अणाव या तिन्ही गावातील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहत पाठिंबा दर्शविला. तसेच भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत झाल्याशिवाय गप्प बसायचे नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन देवून आंदोलन समाप्त करण्यात आले.
     
सिंधुदुर्गनगरी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यालय पत्रकार संघाने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या या आंदोलनाला संघाचे सचिव लवू म्हाडेश्वर, उपाध्यक्ष  विनोद परब, खजिनदार गिरीश परब,सहसचिव सतीश हरमलकर,  जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपकर, गणेश जेठे, दत्तप्रसाद वालावलकर, संजय वालावलकर, नंदकुमार आयरे,विनोद दळवी, मनोज वारंग,  तेजस्वी काळसेकर, आदी पत्रकार संघ सभासद उपस्थित होते. यावेळी अरुण अणावकर ,गुरुप्रसाद दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अजित पवार राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, पत्रकार समिती जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, शेखर सामंत, राजन चव्हाण, ओरोस सरपंच आशा मुरमुरे, माजी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, भाई सावंत, उद्योजक संतोष कदम, रुपेश पावसकर, ओरोस उपसरपंच गौरव घाडीगावकर, दादा साईल, ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या जान्हवी सावंत, सुनील पाटकर, उल्हास मेस्त्री, सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण अध्यक्ष अशोक रासम, अशोक कदम, चंद्रकांत पाटकर, विशाल पारकर, अनिकेत तेंडोलकर, सुशील निंब्रे, अरविंद सावंत, डॉ अशोक महिंद्रे , मेघना उपानेकर, शंकर भोगले, चंद्रकांत सावंत, छोटू पारकर, योगेश तावडे, अमित भोगले, सुनील जाधव, विजय चव्हाण, बाळू कानडे, सुशील परब, प्रकाश जैतापकर,  निलेश परब, माजी सरपंच आप्पा मांजरेकर, पी टी परब, माजी सभापती अंकुश जाधव, अणाव पोलीस पाटील सुनील पाटकर आदींनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शविला.

यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी, सिंधुदुर्गनगरी नगर पंचायतचा विषय नक्कीच लवकर मार्गी लागेल. आजचे पत्रकारांचे आंदोलन १०० टक्के यशस्वी होईल. आम्ही सत्ताधारी पक्ष यासाठी सहमत आहोत. २०१४-१५ मध्ये पहिली अधिसूचना निघाल्यावर श्रेय घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण पुढील कार्यवाही झाली नाही त्याचे खापर सुद्धा आम्हालाच घ्यावे लागेल. पहिली अधिसूचना निघून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने पुन्हा पहिली अधिसूचना काढावी लागेल. नगरपंचायत बरोबर अन्य महत्त्वाचे प्रश्न सोडविले जातील. प्राधिकरण आणि तीन गाव यांचे प्रश्न वेगवेगळे आहे. त्यासाठी प्राधिकरण आणि नगरपंचायत अशा दोन संस्था होतील. त्यात वाद निर्माण होतील. त्यामुळे नगरपंचायत ही एकच संस्था असली पाहिजे. याबाबत स्पष्टता झाली पाहिजे असे सांगितले.
     
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी, मंत्री उदय सामंत यांनी ही नगरपंचायत होण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केले होते. ते ८ व ९ रोजी जिल्ह्यात येत आहेत. यावेळी आपण भेटून त्यांच्याकडे याबाबत सांगुया. पण लोकसभेची आचार संहिता लागण्यापूर्वी ही नगरपंचायत घोषित होईल असा माझा प्रयत्न राहील. यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. अणाव पोलीस पाटील सुनील पाटकर यांनी बोलताना, नगरपंचायत होण्यासाठी पत्रकारांनी विषय उचलून धरला त्याबद्दल आनंद वाटतो. सिंधुदुर्गनगरी मधील तिन्ही गावांना वाली कोण नाही. कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या सुविधा देखभाल अभावी दुरवस्थेत आहेत. ३० वर्षात कोणताही बदल झालेला नाही. सर्व ग्रामस्थ यासाठी आपल्या पाठीशी आहोत असे सांगितले.
      
ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या जान्हवी सावंत यांनी बोलताना नगरपंचायत व्हावी, ही सर्वांचीच मागणी होती. पण विषय मी काढू की तुम्ही काढणार ? असे होत होते. पत्रकारांनी यासाठी पुढाकार घेत सर्वांच्या मनातील विषयाला व्यासपीठ मिळवून दिले आहे असे सांगितले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  उमेश तोरसकर यांनी, पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत आहे. याचे समाधान वाटत असल्याचे सांगितले.  संतोष वायंगणकर यांनी, सर्व पक्षीय एकत्र आल्यावर कोणतीही समस्या जास्त काळ प्रलंबित राहणार नाही. या आंदोलनातून राजकीय इच्छा शक्ती निर्माण होवून दबाव तंत्र निर्माण होवू शकते असे सांगितले. सुप्रिया वालावलकर यांनी, लोकांनी पुंजी पुंजी गोळा करून घरे बांधली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळतील, अशी आशा त्यांना होती. परंतु, अनेक समस्यांचा या लोकांना सामना करावा लागत आहे असे सांगितले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष इरशाद शेख यांनी, पत्रकारांना आंदोलन करावे लागते हे राजकारणी म्हणून मला शरम वाटते. जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या सर्वांचे हे अपयश आहे. हरकती मागवून आठ वर्षे झाली तरी शेवटची अधिसूचना काढली गेली नाही. यासाठी सर्वांनी एकत्रित यावे, असे सांगत आंदोलनासाठी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी दादा साईल, शेखर सामंत, सुनील जाधव, अंकुश जाधव, गणेश जेठे यांच्यासह अन्य असंख्य उपस्थितांनी नगरपंचायत होण्यासाठी पाठिंबा दर्शविणारे विचार मांडले. सुत्रसंचलन लवू म्हाडेश्र्वर यांनी केले. तर आभार बाळ खडपकर यांनी मांडले.


सिंधुदुर्गनगरी नगरपचायत निर्मिती होईपर्यत लढा सुरु राहणार : संदीप गावडे
नगरपंचायत होण्यासाठी आम्ही केलेल्या आंदोलनाला  सर्वपक्षीय, सर्व स्तरातील नागरिक यांचा पाठिंबा मिळाल्याने हे आंदोलन यशस्वी होत आहे. आता आम्हाला थाबायचे नाही. २६ जानेवारी पर्यंत याबाबत हालचाली दिसल्या नाहीतर तीव्र आंदोलन करण्याची तयारी आम्ही केली. त्यामुळे जोपर्यत सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत होत नाही तोपर्यत लढा सुरूच राहील अशी आंदोलनाची भूमिका सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांनी स्पष्ट केली.