वेंगुर्ला मांडवी खाडी ते नवाबाग रस्त्यासाठी मागणी | वेंगुर्ला शिवसेनेचे दीपक केसरकर यांना निवेदन

Edited by: दिपेश परब
Published on: September 13, 2023 19:15 PM
views 48  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला शहर व उभादांडा या भागातील नागरिकांनी दोन्ही गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ‘वेंगुर्ला मांडवी ते नवाबाग रस्ता‘ पुलाच्या माध्यमातून व्हावा अशा शिवसेनेकडे केलेल्या मागणीचे निवेदन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन वेंगुर्ल शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम यांनी शिवसेना पदाधिका-यांच्या उपस्थितीत सादर केले.

वेंगुर्ला शहर पर्यटनदृष्ट्या विकसीत होत आहे. त्यासाठी आपण शहरातील अनेक पर्यटन कामांना देत असलेल्या निधीमुळे हे शक्य होत आहे. आपण झुलत्या पुलासाठी केलेले प्रयत्न करून ते पुर्णत्वास नेले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणांत असते. तसेच बंदर, लाईट हाऊस व सागर बंगला आणि समुद्राच्या लाटांचा आनंद लुटण्यास मोठ्या प्रमाणांत वाहनांची वर्दळ असते. वेंगुर्ला शहर व उभादांडा-नवाबाग या गावातील अनेक जेष्ठ नागरीकांतून, महिलांमधून व मच्छीमार व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक यांचेकडून शहर मांडवी ते उभादांडा-नवाबाग जोडणारा पुल बांधला गेल्यास त्याचा फायदा लहानमुले, महिला, जेष्ठ नागरीक यांसह पर्यटक स्थानिक बेरोजगार युवक-युवतींना आणि मच्छिमार व्यावसायिकांना होणारा आहे. नवाबाग येथे मत्स्यजेटी आहे. पण तेथून मच्छिमार्केटमध्ये येण्यास अंतर लांब असल्याने रस्त्याने मच्छिमारांस मासे बाजारात आणण्यास उशीर होतो. जर वेंगुर्ला शहर मांडवी ते उभादांडा-नवाबाग जोडणारा पुल झाला तर १० मिनीटांत ताजी मच्छी बाजारात येईल. त्याला भावही चांगला मिळून स्थानिक मच्छिमारांचा फायदा होऊ शकतो. तसेच या पुलामुळे आपण नवाबाग येथे होऊ घातलेला फिशरमन व्हीलेज प्रकल्प सुध्दा यशस्वी होणार आहे. मांडवी खाडी किनारी महिला कांदवळवन सफारी प्रकल्प असल्याने रस्ता झाल्यास येथे पर्यटन वाढेल. 

मांडवी ते नवाबाग या दोन्ही मधील अंतर सुमारे ३० ते ४० मीटर एवढे असून पर्यटन व मच्छिमारांचा विकास साधण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक तो निधी मंजूर करून हे विकास काम करावे. या कामाची नोंद झुलत्या पुलाप्रमाणे वेंगुर्लावासीयांत व मच्छीमारांत कायम स्वरूपी राहिल. हे विकास काम तातडीने होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन सादर करतेवेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, बाळा दळवी, युवा सेना शहर पमुख संतोष परब, महिला शहर प्रमुख अँड. श्रद्धा बावीस्कर-परब, उप जिल्हा प्रमुख सुनील डुबळे, अल्पसंख्याक महिला शहर शाखा प्रमुख शबाना शेख, शाखा प्रमुख मनाली परब यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.