रेशन दुकानदारांना मानधनाची मागणी

दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 01, 2023 13:21 PM
views 609  views

सिंधुदुर्ग : तुटपुंज्या कमिशन वर आपल्या कुटुंबाचे पोषण करताना रास्त धान्य दुकानदार मेटाकुटीला आला आहे, त्यामुळे रास्त धान्य दुकानदाराला मानधन मिळावे तसेच पॉस मशीन सर्वर तांत्रिक अडचणीमध्ये दुकानदाराला जगणे नकोसे झाले आहे. या सर्वांचा शासनाने विचार करावा अन्यथा १ जानेवारी २०२४ पासून सर्व रास्त भाव धान्य दुकाने व रॉकेल धारक दुकानदारानी दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्त भाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटना यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आलं. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक मनीष दळवी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यासोबत रास्त धान्य दुकानदार आंदोलनासंदर्भात व निवेदनाबाबत चर्चा केली व तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना केली. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी तातडीने जिल्हास्तरीय प्रश्नांवर येत्या पाच डिसेंबर नंतर कार्यवाही करू असे सांगत रास्त भाव दुकानदारांच्या राज्यस्तरीय मागण्यांबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्त भाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटना जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर, उपाध्यक्ष कानोबा देसाई, सचिव शैलेंद्र कुलकर्णी, यांच्यासह कणकवली तालुका अध्यक्ष किशोर नारकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष तात्या हाडये, मालवण तालुकाध्यक्ष सुनील मलये, देवगड तालुका अध्यक्ष विकास गोखले, वैभववाडी तालुकाध्यक्ष नासिर भाई काझी, कुडाळ तालुका अध्यक्ष उमेश धुरी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गणपत राणे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष सतीश मोरेस्कर आदी उपस्थित होते.