होळी स्पेशल जादा रेल्वे सोडण्याची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: February 06, 2025 11:20 AM
views 214  views

सावंतवाडी : होळी हा कोकणातील मोठा सण असून याला लाखो चाकरमनी आपल्या परिवारासोबत कोकणातील आपल्या मूळ गावी जातात. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित रेल्वेचे आरक्षण काही मिनिटांतच फुल होतं असल्यानं प्रवासी संघटनेच्यावतीने जादा होळी स्पेशल रेल्वे मुंबईच्या मध्य व पश्चिम रेल्वेवरून सोडाव्यात अशी मागणी कोकण रेल्वेकडे करण्यात आली आहे.

१४ मार्च ला होळी असल्याने ह्या रेल्वे ५ मार्चपासून सुरू कराव्यात.तसेच मार्च अखेरपर्यंत मुंबईतील मुलांच्या परिक्षा संपल्यावर मुलांसह पालक मोठया प्रमाणातील कोकणातील आपल्या गावी जात असल्याने ह्या जादा रेल्वे पुढे एप्रिल मे ची गर्दी लक्षात घेऊन  जूनपर्यंत सुरू ठेवाव्यात अशी मागणीही करण्यात आलेली आहे. शिमगा हा कोकणातील गणपती एवढाच मोठा सण आहे. इतर वेळी ग्रामस्थांना आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जावे लागते. मात्र शिमगा हा कोकणातील असा एक उत्सव आहे की यावेळी ग्रामदेवतेची पालखी गावकऱ्यांच्या घरी येते. यासाठी कोकणातील प्रत्येक घरामध्ये चाकरमानी आपल्या परिवारासोबत गावाला जातात. म्हणून चाकरमन्यांचा प्रवास सुलभ व सुखकर करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यासाठी प्रवासी संघटनेने कोकण रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेली आहे.

मे महिन्यामध्ये कोकणात मोठया प्रमाणात लग्न समारंभ होत असल्याने त्याला मोठया प्रमाणात चाकरमनी नातेवाईकांसोबत मुंबईतून कोकणात जातात. तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईतील शाळा कॉलेजीस सुरु होत असल्याने चाकरमनी परतीच्या प्रवासाला लागतात. यामुळे ह्या जादा रेल्वे जूनपर्यंत चालवाव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेने केलेली आहे.