
सावंतवाडी : सातुळी बावळाट येथे सिंधुदुर्गची पर्यटन माहिती देणारी कमान उभारण्यात यावी अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी सार्वजनिक बांधकाम उप अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आंबोली घाट हा पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असल्याने घाटाच्या पायथ्याशी असलेल्या सातोळी-बावळाट लाठीजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती देणारी मार्गदर्शन कमान उभारण्यात यावी.
सावंतवाडी येथे जाणाऱ्या मार्गावर ही कमान उभारण्यात यावी. यामध्ये सावंतवाडीचा ऐतिहासिक राजवाडा, छ. शिवरायांनी उभारलेला मालवण किल्ला, वेंगुर्ला येथील रेडीचा गणपती, देवगड कुणकेश्वर मंदिर तसेच जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांची माहिती देणारी कमान उभारण्यात यावी. या कामानीमुळे अनेक पर्यटकांना फायदा होईल, सिंधुदुर्गतील पर्यटन स्थळांची माहिती त्यांना मिळेल व पर्यटनाला चालना मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर ही कमान उभारण्यात यावी ही विनंती अशी मागणी श्री. सुर्याजी यांनी केली आहे.