शासकीय कार्यालयात अनधिकृत प्रवेश व अर्वाच्य वर्तन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 14, 2025 18:22 PM
views 84  views

सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलणे, अपमानास्पद वर्तन करणे तसेच खोटे आरोप करणे अशा प्रकारचा त्रास एक व्यक्तीकडून दिला जात असून त्या व्यक्तीवर शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

        राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगांवकर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाशिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, एक व्यक्ती शासकीय कार्यालयांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून कर्मचाऱ्यांना धमकावणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करीत आहे. याच व्यक्तीने १० ऑक्टोबर २०२५ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्या दालनातही अशाच प्रकारचे वर्तन केले. यापूर्वी वेंगुर्ला तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तसेच पोलीस स्टेशन येथेही अशा घटना त्याच्याकडून घडल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

     या प्रकाराने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा कृत्यांवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून संबंधित व्यक्तीवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.जर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन कामबंद आंदोलन करतील. असा इशारा देखील देण्यात आला आहे.