विकसित भारतच्या माध्यमातून योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

केंद्रीय सह सचिव संकेत भोंडवे यांचं आवाहन
Edited by:
Published on: December 15, 2023 19:27 PM
views 62  views

सिंधुदुर्गनगरी : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष योजना लाभार्थी पर्यंत पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व आयटी विभागाचे सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे प्रभारी अधिकारी संकेत भोंडवे यांनी केले. 

विकसित भारत संकल्प यात्रा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपूरे, जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी तसेच तहसिलदार, गट विकास अधिकारी, व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर दूरदृश्यप्रणालीव्दारे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्याचा विकसित भारत संकल्प यात्रा मध्ये केलेल्या कामाचा व नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

केंद्रीय सह सचिव भोंडवे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. या माध्यमातून विविध योजना या प्रत्यक्ष लाभार्थी पर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. जेणेकरुन शेवटच्या घटकातील लाभीर्थींना योजनेचा लाभ मिळेल. योजनेच्या लाभा अभावी एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करुन लाभार्थ्यांना लाभ कसा मिळेल, याचे नियोजन करावे. विविध समाज माध्यमांचा वापर करुन लाभार्थी पर्यंत विविध योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा. गावपातळीवरील महसूल, जिल्हा परिषद, कृषी विभागांच्या कर्मचाऱ्यांमार्फत योजना पोहोचिवण्यासाठी मदत घ्यावी. शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्राची मदत घ्यावी, असे सांगून भोंडवे म्हणाले, रत्नागिरी व सिंधुदुर्ग दोन्ही जिल्हे मिळून विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वीरित्या राबविण्यासाठी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. 

जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले , विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. गावागावात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या यात्रेच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती नागरिकांना मिळत आहे असेही ते म्हणाले.