
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार सिंधुदुर्गची कौशल्याप्रधान मुलांची पहिली बॅच जर्मनीत रवाना होत आहे. या मुलांनी जर्मनीत जाण्यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आशीर्वाद घेत ऋण व्यक्त केले. तसेच उपस्थित पालकांकडून श्री. केसरकर यांचे आभार मानले.
राज्य सरकारने जर्मनीमधील बाडेन वुटेनबर्ग राज्याशी करार करून ३१ कौशल्यांशी संबंधित मनुष्यबळ पुरविण्याबाबत तयारी केली आहे. त्यानुसार येत्या दीड वर्षात चार लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन जर्मनीत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी निवड झालेल्या युवकांना कौशल्यांचे शिक्षण देण्यात आले तसेच जर्मन भाषेच ज्ञान भोसले नॉलेज सिटी, नाथ पै कॉलेज कुडाळ येथे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच जर्मनीला रवाना होत आहे. राज्यातून १५० मुलं पहिल्या टप्प्यात जात असून त्यातील २५ ही जळगावची तर उर्वरीत मुलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रवाना होत आहेत. या विद्यार्थ्यांनी दीपक केसरकर यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. तर विद्यार्थ्यांच्या पालकांकडून यासाठी राज्य सरकार व श्री. केसरकर यांचे आभार मानले आहेत. यावेळी सौ. सोनाली केसरकर-वगळ, सुरज परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी आदी उपस्थित होते.