
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उद्धव ठाकरेंपेक्षा कणभर जास्त अभिमान आम्हाला आहे. महाराजांवर ते बोलले हे आक्षेपार्ह होत. पुतळा कोसळल्यावर चुक केलेल्यांना प्रायश्चित्त भोगावं लागल. त्याच्या चुकीचा दोष सरकारला देणं योग्य नाही. घडलेल्या घटनेच आम्हालाही दुःख आहे. मात्र, विरोधक राजकारण करत आहेत असा पलटवार महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी केला. तसेच राजकोट येथे छत्रपतींचा पुतळा देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकार साकारत आहे. राजकोट येथे 'उर्जा हिंदुत्वाची' व विजयदुर्ग येथे 'मराठा आरमार संग्रहालय' साकारणार आहे. आचारसंहितेपूर्वी मंत्रीमंडळात या प्रस्तावास सादरीकरण केल्याची माहिती श्री. केसरकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी इथे येऊन टीका करणं समजू शकतो. पण, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलले ते आक्षेपार्ह होत. घडलं ते वाईट होत हे सांगताना मी वाईटातून चांगलं घडत अस म्हणालो होतो. राजकोट येथे आता होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकार साकारत आहे. तसेच शिवसृष्टीची उभारणी येथे करण्यात येणार आहे. उर्जा हिंदुत्वाची ही संकल्पना तेथे साकार होणार आहे. या प्रस्तावाच सादरीकरण मंत्रीमंडळाच्या बैठकीत केलं गेलं आहे. स्थानिक आमदारांना येथे आरक्षण आहे याचीही कल्पना नव्हती. आम्ही ती आरक्षण शोधून काढत चांगले आराखडे तयार केलेत. जेटीचा आराखडा तयार केलाय. आचारसंहितेपूर्वी २० दिवस अगोदर मंत्रीमंडळात ते सादर करण्यात आले होते. एक अद्वितीय असा प्रकल्प तिथे साकार होणार आहे. छत्रपतींच्या नावीक दलाचे सरसेनापती कान्होजी आंग्रे यांच्या कामगिरीची आठवण म्हणून विजयदुर्गला देखील मराठा आरमार संग्रहालय साकारल जाणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी याबाबत सांगता आलं हे माझं भाग्य समजतो असंही ते म्हणाले. तसेच पुतळा कोसळल्यावर त्या कलाकाराला, आर्कीटेक यांना शिक्षा झालेली आहे. सरकारचा यात कोणताही संबंध नाही हे यातून लक्षात येत. चुक घडल्याने कलाकाराला प्रायश्चित्त भोगावं लागलेलं आहे. त्याच्या चुकीचा दोष सरकारला देणं योग्य नाही. घडलेल्या घटनेच आम्हाला दुःख आहे. मात्र, विरोधक त्याचे राजकारण करत आहेत. महाराजांबद्दलचा आदर आमच्या मनमनात आहे. छत्रपती घराण्याचा आदर राखणारी आम्ही माणसं आहोत. संभाजीराजे छत्रपतींना ऍफिडेव्हीट विचारणारी लोक आम्ही नाहीत. छत्रपतींचा तुमच्यापेक्षा कणभर जास्त अभिमान आम्हाला आहे असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.
दरम्यान, युवकांमध्ये असणारी अस्वस्थता बघता जिल्ह्यात रोजगार निर्मिती करण्यासह जर्मनीसारख्या ठिकाणी महिना तीन लाख पगाराच्या नोकऱ्या आम्ही देत आहोत. महाराष्ट्र शासनाकडून तसा करार देखील केला आहे. भारतातला हा मोठा करार आहे. पहिली बॅच जर्मनीला रवाना होत आहे. राज्यातून दीडशे मुलं जात असून २५ मुलं जळगावची व उर्वरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. युवकांना केवळ भडकवण्याच काम सुरू आहे. त्यासाठी वेगळी सोय मी करत आहे. वाफोली सारखं मॉडेल अन्य ठिकाणी आम्ही राबवत आहोत. उद्योगांसह पर्यटन योजना या भागात कार्यान्वित होत आहेत. चांदा ते बांदा, सिंधुरत्न योजना उत्पन वाढविणाऱ्या आहेत. खासगी उद्योग उभारत ८६० मुलांना माझ्या माध्यमातून रोजगार दिला गेलाय. अशा पद्धतीचे प्रकल्प भविष्यातही उभे राहतील. आडाळीत हजारो मुलांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. चुकीच्या पद्धतीने युवकांत गैरसमज करून दिले जात आहेत. सावंतवाडीच एसटी स्टँड बीओटी तत्त्वावर सुधारीत होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट बसस्थानक ही असणार आहे. कणकवली आणि सावंतवाडीची स्थानक यातून होत आहे. त्यामुळे येथील काम प्रलंबित राहील आहे. काही गोष्टींची डागडुजी तुर्त स्वरूपात मी करून दिली आहे.मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. युवराज लखमराजे यांनी त्याबाबत स्पष्टोक्ती केलीय असंही त्यांनी सांगितलं. यावेळी सौ सोनाली केसरकर-वगळ, सुरज परब, अशोक दळवी आदी उपस्थित होते.