उपऱ्या तेलींकडून केसरकरांवर बेछूट टीका !

अशोक दळवींचा हल्लाबोल
Edited by: विनायक गांवस
Published on: July 09, 2024 13:25 PM
views 222  views

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात येऊन समाजसेवकाचा आव आणणारे उपरे समाजसेवक राजन तेली हे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर बेछूट टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्र एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार चांगल्याप्रकारे काम करीत आहे. या सरकारमध्ये  दीपक केसरकर हे कॅबिनेट मंत्री म्हणुन उल्लेखनीय व दर्जेदार काम करीत आहेत. महायुतीतील भाजप पक्षाचे पदाधिकारी असुनही राजन तेली महायुती विरोधात काम करत आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहेत. अनेक खोटेनाटे आरोप करुन आपली आमदारकीची सीट मिळवण्याची पोळी भाजण्यासाठी ते नाहक आरोप करीत आहेत असा हल्लाबोल शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केला. 


ते म्हणाले, केसरकर यांची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. गिनिज बुकमध्ये नोंद होण्यासाठी व जागतिक रेकॉर्ड करण्यासाठी तशा प्रकारचे काम करावे लागते. दीपक केसरकर यांच्यामध्ये तशी पात्रता आहे. म्हणुनच ते रेकॉर्ड करु शकले. प्रथम राजन तेली यांनी हे समजुन घ्यावे. शाळांचा गुणात्मक विकास असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध प्रकारचे उपक्रम असतील किंवा जर्मन भाषा शिकून जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रकल्प असेल अशा अनेक संधी केसरकर यांच्यामुळे जिल्ह्यातील लोकांना उपलब्ध होत आहेत.


महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय असेल किंवा हजारोंच्या संख्येने शिक्षक भरतीचा निर्णय असेल असे अनेक मोठे निर्णय मंत्री म्हणुन केसरकर यांनी  घेतलेले आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. राजन तेली ज्या संचमान्यतेच्या निर्णयाबाबत कोल्हेकुई घालून जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत तो निर्णय केंद्रशासनाच्या बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या धर्तीवर तयार केलेल्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २०११ च्या आधारे असून हा शासन निर्णय करण्यापुर्वी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन समितीच्या अभ्यासानुसार व शिक्षण आयुक्त यांनी विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पारित करण्यात आलेला आहे. 


कोणताही शासन निर्णय काढताना तो सर्वसमावेशक व सर्वांना विश्वासात घेऊन शासकीय निकष आणि शासकीय धोरणाचा विचार करुन काढला जातो. त्यामध्ये काही चुकीचे असेल तर विहित पद्धतीने त्यात बदलही करता येईल. संघटनेच्या मागणीनुसार त्यावर यापुर्वीच कार्यवाही सुरु झालेली आहे. यथावकाश त्यात नियमानुसार बदलही होईल‌. पण, या उप-या नेत्याने केवळ मंत्री केसरकर यांची बदनामी करणे व विरोध करण्याच्या हेतुने नाहक टीका केली आहे. जुने कागदी घोडे नाचवून पुर्ण माहिती न घेता आपली पोळी भाजून घेण्यासाठी तेली केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. यामधुन ते शिक्षकांची व नागरीकांची दिशाभूल करीत आहेत. तेलींची अवस्था विजणा-या दिव्यासारखी झाली आहे. दिवा विजायला जेव्हा येतो तेव्हा त्याची वात जास्त फडफडते. शिक्षक भरती होईपर्यंत स्वयंसेवी शिक्षक नेमण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला सुद्धा मान्यता देण्यात आली होती. आणि त्यानुसार गतवर्षी जिल्हापरिषदेने सुशिक्षीत डी.एड/ बी. एड बेरोजगारांची गुणवत्तेनुसार व गरजेनुसार रिक्त पदावर नियुक्ती दिली होती. शेजारच्या जिल्हयातील घटनांचा उल्लेख करुन आपल्या महायुतीतील नेत्यांचा कमीपणा दाखवणे हा एककलमी कार्यक्रम राजन तेली सध्या करीत आहेत. महायुतीचे सरकार असताना अनावश्यक गोष्टींना फुंकर घालून सरकारच्या अडचणी वाढवण्याचे ते काम करीत आहेत. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या निदर्शनास आणुन दिलेले आहेच. 

मात्र तेली यांच्यामध्ये बदल न झाल्यास त्यांना जशास तशे उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अँड. निता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, महिला शहराध्यक्षा भारती मोरे यांनी दिला आहे.