
सावंतवाडी : राजन तेलींना पराभव दिसू लागल्याने ते भीतीपोटी धमक्या, दहशतवाद अशा प्रकारची विधाने करत आहेत. मोठ्या लोकांची नाव घेतली की प्रसिद्धी मिळते यासाठीच त्यांनी राणेंचे नाव घेऊन त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. लोकांनी अशा आरोपांवर लक्ष देऊ नये असा पलटवार शालेय शिक्षण मंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी केला आहे. तर खरा दहशतवादाचा धोका हा राजन तेलींकडूनच आहे. इतर मतदारसंघातून सावंतवाडीत येऊन ते निवडणूक लढवत आहेत. ते स्वत दहशतवादाचे प्रतीक आहे म्हणूनच माझा त्यांना विरोध आहे असेही केसरकर म्हणाले. आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
ते म्हणाले, राजन तेली यांच्याकडून राणे कुटुंबाकडून आपल्याला धमक्या येत असल्याचा होणारा आरोप खोटा आहे. उलट राणेंचे नाव घेऊन आपल्याला प्रसिद्धी मिळणार यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. तेली हे मी केलेल्या कामांचा नारळ फोडत आहेत. शिवाय तेच खरे दहशतवादाचे प्रतिक आहेत. त्यामुळे जनतेने त्यांच्या चुकीच्या विधानांवर विश्वास ठेवू नये. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सभेमुळे सावंतवाडीमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण मतदारसंघातच आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असून माझा विजय निश्चित आहे. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, महेश शिरोडकर आदी उपस्थित होते.