'ब्रेक के बाद देखो' !

माझ्यापेक्षा वाईट नारायण राणेंना वाटलं : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2024 11:03 AM
views 522  views

सावंतवाडी : मंत्रीपद न मिळाल्याने मला जेवढं वाईट वाटलं नाही‌ तेवढं वाईट नारायण राणेंना वाटलं. त्यांनी लगेच मला फोन केला. काम करत रहा असा संदेश त्यांनी दिला. तसेच काहीनी मला मंत्रीपद मिळू नये म्हणून विरोध केला. त्यांची किव करावीशी वाटते असा टोला माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांनी हाणत साईबाबांचे आशीर्वाद माझ्यावर  आहेत. त्यामुळे नक्की मला मोठी संधी मिळेल, मंत्रीपदापासून ब्रेक मिळाल्यान सिंधुरत्न योजनेवर अधिक काम करणार आहे. त्यामुळे 'ब्रेक के बाद देखो' असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आम. केसरकर म्हणाले, माझ्या वाटेला शक्यतो कोणी येऊ नये. अंगावर कोणी आले तर सगळं काढाव लागेल‌.‌ मी सरळमार्गी माणूस आहे‌. मंत्री म्हणून चांगलं काम केलं. आता मंत्री असलो नसलो तरी मंत्रिमंडळात माझं वजन तेवढंच आहे‌ अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला. तसेच तरूण तडफदार आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघातील विकास कामाला झपाट्याने सुरूवात केली आहे. त्यांची भक्कम साथ मला सिंधुरत्न योजना राबविण्यात लाभत आहे‌. आता अधिकचा वेळ मिळत असल्याने हा वेळ कोकणसाठी देईन. मंत्री म्हणून मी कमी पडलो नाही. आमदार म्हणून लोकांना भेटण्यात कमी पडलो. तरीदेखील मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकत चौथ्यांदा संधी दिली. येत्या काळात त्यांच्यासाठी काम करणार आहे. सिंधुरत्न योजना अधिक बळकटपणे चालू राहील. तसा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या योजनेच स्वरूप अधिक मोठ झालेलं दिसेल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच मंत्री नितेश राणे यांना देखील चांगल खात मिळालं असून मत्स्य व बंदर विकास यासाठी माझही पूर्ण सहकार्य त्यांना राहील असं ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, पर्यटनाची प्रलंबित काम मी हाती घेतली आहेत. आज सिंधुरत्नची बैठक देखील झाली.‌ ब्राझिलचा माझा दौरा पुढच्या आठवड्यात होत आहे. काजूपासून बनणारे अनेक पदार्थ तिथे बनवले जातात. आम्ही योजनेतून शेतकऱ्यांना यंत्र दिली आहेत. यापुढे काजूचा हा रस कोकण कृषी विद्यापीठ विकत घेणार आहे. काजू घेऊन बोंड फेकून दिलं जातं त्याचा उपयोग होणार आहे. तसेच उरलेल्या चोथ्यापासून मिट व पनीर सारखे पदार्थ तयार केलं जाणार आहेत. या माध्यमातून आर्थिक विकास साधला जाणार  आहे‌. मंत्री असताना महाराष्ट्राच काम केलं. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गत अधिक लक्ष देत आहे. चांदा ते बांदा या योजनेचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे अधिकच लक्ष त्यात घातलं आहे. पर्यटनात्मक प्रकल्पांना अधिक चालना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. हाप ऑन, हाप ऑफ बोटीसह खाडीतील पर्यटन विकासासाठी माझा प्रयत्न आहे‌. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या गोवा राज्याच्या पुढे जावा यासाठी अधिक प्रयत्न राहील. शाश्वत पर्यटन आपल्या भागात आहे. जिल्ह्याच अन् कोकणचं भाग्य उजळण्यासाठी मला ही संधी मिळाली आहे. अनेक योजना अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्या नाहीत. त्या आता प्रभावीपणे राबविण्यावर माझा भर राहील. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे. आता माझ्याकडे वेळ आहे त्यामुळे जातिनिहाय लक्ष घालून मी काम करत आहे असं मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केल.

तसेच रत्नसिंधूमधून पर्यटनाचा विकास होणार आहे. गोल्फ कोर्स, व्हिलेज टुरिझम, बॅक वॉटर टूरिझम आदी प्रकल्प सुरू करण्यावर भर असेल. शेतकरी, बागायतदारांना देखील  योजनेतून अधिकच बळ दिल जाईल. महिलांसाठी विशेष योजना आहे. कुक्कुटपालन, शेळी पालन, दुग्धव्यवसाय यातून शेतकऱ्यांच आर्थिक हीत साधण्याच काम अधिक वेगाने होईल. मच्छिमार, दशावतार कलावंतानाही योजनेतून सुविधा ई-बसेस दिल्या जात आहेत. छोट्या लक्झरी बसेस गावागावात दिल्या जाणार आहेत. हाऊस बोटच काम होणार आहे.‌ त्यामुळे जिल्हा अधिक वेगानं विकसित होईल. विजयदुर्ग येथे सागरी दलाचे सेनापती आंग्रेंच स्मारक व मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. यासह सावंतवाडी मतदारसंघातील सर्व गोष्टी पूर्णत्वास येणार आहे.  फुड सिक्युरिटी आर्मी आम्ही तयार केली आहे. शेतकऱ्यांसाठी सैनिकांप्रमाणे ते काम करतील. आपला जिल्हा आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.