दीपक केसरकर अॅक्शन मोडवर

विकासकामांचा घेतला आढावा
Edited by: दिपेश परब
Published on: February 02, 2025 13:50 PM
views 239  views

वेंगुर्ला :  महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील जलजीवन मिशन योजना, अन्य पाणीपुरवठा योजना तसेच सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत विविध योजनेतील मंजूर कामे यांचा आढावा घेत प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. तसेच विविध समस्यांमुळे रखडलेल्या कामांवर चर्चा करून तोडगा काढण्यात आला. 

आमदार दीपक केसरकर यांनी आता ऍक्शन मोडवर काम करण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम त्यांनी वेंगुर्ला येथे सिंधुरत्न योजनेचा आढावा घेत फूड सिक्युरिटी आर्मीला अधिक बळकटी देण्या संदर्भात चर्चा केली होती. यानंतर ३१ जानेवारी रोजी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील विविध योजनेतील विकासकामांचा त्यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. सर्वप्रथम त्यांनी जलजीवन मिशन व अन्य पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामात काही अडचणी असतील तर पुन्हा याबाबत बैठक लावून त्यावर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.  तसेच तिलारी ते वेंगुर्ला पाणीपुरवठा योजनेचे पाणी जास्तीत जास्त ग्रामपंचायतना देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतना येणारे पाण्याचे बोल कमी करण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तिलारी पाणीपुरवठा योजना ही ग्रामपंचायतने सोलर सिस्टीमवर राबाबवी जेणेकरून त्याचे ग्रामपंचायतला बिल कमी येऊन फायदा होईल अशा सूचनाही करण्यात आल्या. 

यानंतर सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागा अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदार संघात नागरी सुविधा, जिल्हा वार्षिक अशा विविध योजनेतून मंजूर असलेल्या विविध कामाचा आमदार केसरकर यांनी आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकामचे सर्व अभियंता व तिन्ही तालुक्यातील गटविकास अधिकारी उपस्थित होते. यानंतर सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या मंजूर कामामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील धरण प्रकल्पाच्या कामाचा आढावा व प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन सूचना केल्या. तसेच वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी येथील क्रीडा संकुल समितीची बैठक घेऊन विविध सूचना केल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी दिली.