दीपक केसरकरांनी ख्रिस्ती बांधवांना दिल्या नाताळच्या परबी

Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2024 11:19 AM
views 138  views

सावंतवाडी : मिलाग्रीस हायस्कूल येथे ख्रिसमस निमित्त मध्यरात्री हजारो ख्रिस्ती बांधवांच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात आली. राज्याचे माजी शिक्षणमंत्री आम. दीपक केसरकर देखील या प्रार्थनेस उपस्थित होते. यावेळी नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा त्यांनी खास कोकणी भाषेतून ख्रिस्ती बांधवांना दिल्या. तसेच ऐतिहासिक चर्च ठिकाणी नव्यानं  उभारत असलेल्या चर्चसाठी १० लाख रुपयांची देणगी त्यांनी जाहीर केली. दरम्यान, सलग चौथ्यांदा विधानसभेत निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या आम. केसरकर यांच्या कॅथोलिक समाजाकडून सन्मान करण्यात आला. 



सावंतवाडी येथील मिलाग्रीस चर्चमध्ये ख्रिसमसच्या आदल्या रात्री ही प्रार्थना करण्यात आली. येशू जन्माची कहाणी, सर्वधर्मसमभाव, सर्वत्र समानता, मानवधर्म, मानवता, देवावर विश्वास ठेवून सेवा, क्षमा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या कहाण्या फादर यांनी उपस्थितांना सांगितल्या. तदनंतर येशू जन्मोत्सव साजरा करण्यात आला. २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून हा दिवस साजरा केला गेला. यानिमित्ताने चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली. हजारो ख्रिस्ती बांधव, भगिनी, लहान मुले नवीन कपडे घालून प्रार्थनास्थळी उत्साहात सहभागी झाली होती. एकमेकांना त्यांनी नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फादर मिलेट डिसोझा यांनी उपस्थितींना संबोधित करताना शांतता व शिस्तबद्धतेचा संदेश दिला. दरम्यान, कॅथोलिक असोसिएशन सावंतवाडी व ख्रिस्ती बांधवांकडून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत निवडून आलेल्या दीपक केसरकर यांचा सन्मान करण्यात आला. 

याप्रसंगी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, शांतीचा संदेश येशू ख्रिस्ताने दिली आहे. सावंतवाडी शहरात ही शांतता तशीच जपावी. ईश्वराचे आशीर्वाद सदैव आपल्यावर राहोत. सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा विकसित करण्यासाठी देवानं मला संधी दिली आहे‌. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत मतदारसंघातील सगळी कामं पुर्णत्वास आणणार आहे‌ असं केसरकर यांनी सांगितले. तसेच सिल्व्हर ज्युगलीसाठी १ लाख व चर्चच्या बांधकामासाठी १० लाख रूपयांची देणगी त्यांनी जाहीर करत ख्रिस्ती बांधवांना नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फादर अॅण्ड्रू डिमेलो, फादर मिलेट डिसोझा, फादर रिचर्ड साल्डना, फादर रॉजर डिसोझा, फादर रॉबिन फर्नांडिस, फादर फिलीप गोन्सालवीस, सिस्टर यांसह हजारो ख्रिस्ती बांधव, भगिनी उपस्थित होते.