
वेंगुर्ला : वेंगुर्ले शहरातील ब्रिटिश कालीन असलेल्या नारायण तलावाच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांच्या पाठपुराव्याने ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच या तलावातील गाळ काढणे व उर्वरित बांधकामासाठी ३.५ कोटी एवढ्या निधीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. यामुळे पुढील काळात या तलावासाठी एकूण ४.५ कोटी एवढा निधी मंजूर होणार असून यामुळे शहरातील गावडेवाडी, दाभोसवाडा यांच्या सहित उंच भागातील घरांना होणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
वेंगुर्ले शहरातील ब्रिटीशकालीन असलेल्या नारायण तलावाची भिंत पडल्याने तसेच गाळ साचल्याने व उर्वरित भागाला भिंत नसल्याने या तलावात पाणी टिकून राहत नव्हते त्यामुळे गावडेवाडी, दाभोसवाडा, राजवाडा, विठ्ठलवाडी, बंदर रोड आणि मांडवी या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. याबाबत नारायण तलाव या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती. याची दखल घेत जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून या तलावाची पहिल्या टप्प्यात भिंत बांधण्यासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच या तलावाच्या उर्वरित कामासाठी म्हणजेच तलावातील गाळ काढणे, उर्वरीत भिंत बंधने, स्वतंत्र्य पाईपलाईन करून टाकी बांधणे आदी कामासाठी ३.५ कोटी रुपये एवढा निधी लागणार असून याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. यामुळे पुढील काळात नारायण तलावाचे सर्व काम पूर्ण होऊन शहरातील उंच भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. त्यामुळे नारायण तलावाची निधी मंजूर केल्या बद्दल नागरीकांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांचे आभार मानले आहेत.