आदित्य ठाकरे पोरकट : दीपक केसरकर

Edited by:
Published on: December 22, 2024 15:11 PM
views 106  views

सावंतवाडी : आरोप करणारे आदित्य ठाकरे पोरकट आहेत. १३२ कोटीच टेंडर ११ कोटी कमी आलं. यात पैसे कोण खाऊ शकत का ? असा सवाल माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी करत ठाकरेंच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. पुर्वी काही विशिष्ट मुलांना मोफत गणवेश वाटप करण्यात यायचं. मी मंत्री झाल्यावर सरसकट मुलांना मोफत गणवेश व ड्रेस कोड उपलब्ध केला. याचीही कल्पना आदित्य ठाकरेंना नाही असा टोला हाणला. मुलांची काळजी घेणारा मी मंत्री होतो. मला हे काय शिकवणार असा पलटवार दीपक केसरकर यांनी केला. 

ते म्हणाले, ठाकरेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात रहायला हॉटेल अन् गाडीत पेट्रोल कोणी देत नव्हत. नारायण राणे यांच्यासोबत मी संघर्ष केला अन् शिवसेनेला सिंधुदुर्गात यश मिळालं. आमचा तात्विक लढा संपवून आम्ही एकत्र आलो. आज विनायक राऊत खासदार नाही अन् वैभव नाईक आमदार नाहीत. नारायण राणेंना मोठं मताधिक्य सिंधुदुर्गन देत लोकसभेला पाठवलं. मी मंत्री नाही आहे याचं मला अजिबात दुःख नाही.‌ मी माझ्या तत्वांसाठी राजकारणात आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची मी भेट घडवून आणली. पंधरा दिवसांत युतीची सत्ता महाराष्ट्रात येणार होती‌. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वासोबत रहायचं होतं. मात्र, आदित्य ठाकरेंचा त्याला विरोध होता. त्यांना कॉग्रेसचा ऍटरॅक्शन जास्त आहे. सावरकरांवर अपमानास्पद बोलणाऱ्या राहुल गांधींना मिठी मारताना आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे होती. बाळासाहेब ठाकरेंनी सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांना मुंबई बंद केली होती. आदित्य ठाकरेंना शिवसेना संपवायची आहे. बाळासाहेबांची खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. निवडणूकीत ते स्पष्ट झालं. ठाकरे शिवसेनेला पडणारी मत ही अल्पसंख्याकांची आहे‌. कॉग्रेससोबत नसेल तेव्हा महापालिकेत ठाकरे सेनेला त्यांची जागा दिसून येईल, असा जोरदार हल्लाबोल दीपक केसरकर यांनी करत आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिल.