
सावंतवाडी : सावंतवाडी मतदार संघातून दीपक केसरकर यांच्या विजयाचा चौथ्यांदा गुलाल उधळून महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजयाचा आनंद साजरा केला. केसरकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर असल्याने अर्ध्या फेऱ्या संपताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळला. विरोधकांना चारी मुंड्या चीत करत केसरकरांनी खेचलेल्या विजयश्रीमुळे कार्यकर्त्यांत उत्साह द्विगुणित झाला होता. बाजारपेठेत भव्य विजयी मिरवणूक काढून विरोधकांना चपराक दिली.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अंतिम निकालानंतर सावंतवाडी मतदान संघावर पुन्हा भगवा फडकला. केसरकर यांनी आपले अस्तित्व कायम ठेवत विरोधकांचे पानीपत केले. त्यांच्या या विजयाचा सावंतवाडी शहरात तिनही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विजयाचा गुलाल उधळला. मतमोजणी केंद्र तहसीलदार कार्यालय आवारात हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल-ताशे वाजवून विजयी जल्लोष केला. "दीपक भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं " अशा घोषणा देत केसरकर यांना उचलून घेत विजयाची खुणा दाखवत विजयी माला त्यांच्या गळ्यात घातल्या. त्यानंतर सावंतवाडी शहरात भव्य विजयी मिरवणूक काढली गेली.