
सावंतवाडी : प्रतिपंढरपूर असणाऱ्या सावंतवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिक एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पहाटे शेकडो भक्तांच्या उपस्थितीत काकडे आरती पार पडली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर देखील विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले होते.
कार्तिक एकादशी निमीत्त सप्ताहाचे आयोजन विठ्ठल रखुमाई मंदिरात करण्यात आले आहे. महाएकादशीला श्री व सौ अजित वारंग दांपत्याकडून विठ्ठल रखुमाईची पूजा करण्यात आली. पुरोहितांच्या उपस्थितीत कार्तिक स्नान विठ्ठलाला घालण्यात आले. यावेळी शेकडो विठ्ठल भक्तांनी उपस्थित राहत या सोहळ्यात सहभाग घेतला. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी देखील यावेळी उपस्थित दर्शविली होती. विधानसभा निवडणूकीत यश दे, असं साकडं त्यांनी विठूराया घातलं. विठ्ठल भक्तीत ते तल्लीन झाले होते.
मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त यावेळी उपस्थित होते. दिवसभर यज्ञ, आध्यात्मिक कार्यक्रम, पालखी, महाआरती आदी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहेत.