केसरकरांची सभा राणे पितापुत्रांनी गाजवली !

केसरकरांना पुन्हा राज्यात मंत्री होण्यासाठी आशीर्वाद द्या : नारायण राणे
Edited by: विनायक गांवस
Published on: October 29, 2024 13:33 PM
views 368  views

सावंतवाडी : दीपक केसरकर यांच्या कामाची पोचपावती मागायला आम्ही आलोत. जिल्ह्यातील प्रगतीत केसरकर यांचही मोठं योगदान आहे. योग्य माणूस निवडल्यास पुढच्या पाच वर्षांत समृद्धी येईल. त्यामुळे केसरकर यांना पुन्हा राज्यात मंत्री होण्यासाठी पुन्हा आशीर्वाद द्या. जेलमध्ये राहिलेल्या लोकांना जागा दाखवा असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी सावंतवाडीकरांना केले‌. सावंतवाडी येथे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या सभेत ते बोलत होते. 

खासदार राणे म्हणाले,केसरकरांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बघता ही निवडणूक जिल्हा परिषदची वाटत आहे. आमच्या नेत्यांची पिशवी धरणारे राजन तेली उबाठाचे उमेदवार आहे. टक्केवारीत सहभाग असणारे ते आहेत‌. कणकवलीहून सावंतवाडीत का आले ? ते ठावूक नाही. जनसेवा, लोकसेवेत त्यांच योगदान काय आहे ? कधी कोणाला चार पैशांची मदत केली का ? असा सवाल राणेंनी केला. पावसात बेडूक उड्या मारतो तसा राजन तेली निवडणूक आली की उड्या मारतो. तर समोरच्या दोघा उमेदवारांनी एखादी बालवाडी तरी काढली का ? काय काम केलं ते सांगाव. केसरकर, निलेश, नितेश निवडणूकीच्या रिंगणात आहेत.‌ते निश्चित विजयी होतील. काही उमेदवार पैसा वाटत आहेत. त्यांची फॅक्टरी कुठे आहे ते विचारा. दोन नंबरचे धंदे यांचे आहेत. विशाल परब यांची तक्रार घेऊन काही लोक दिल्लीत आलेले. ब्राऊन शुगरचा सप्लायर कोण ? याच नाव पोलिसांंनी जाहीर करावं असं आव्हान दिले. तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पुन्हा राज्यात मंत्री होण्यासाठी पुन्हा आशीर्वाद द्या. जेलमध्ये राहिलेल्या लोकांना जागा दाखवा अस मत व्यक्त केलं.

लोकहितासाठी राजकारणात, रेशमी वस्त्रांचा त्याग : दीपक केसरकर

यावेळी केसरकर म्हणाले, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी अर्ज दाखल करत आहेत. माझ्या वडीलांनी आजवर अनेकांना रोजगार दिला. रेशमी वस्त्र उतरून खादीची वस्त्र मी लोकसेवेसाठी घातली आहेत. सिंधुरत्न योजनेतून कोकणी जनतेच हीत साधण्यासाठी सर्वकाही केलं आहे. पर्यटन जिल्ह्यात लाईव्ह स्टार हॉटेल आणलं. शेतकऱ्याना अतिरिक्त ६० कोटी कंपनीकडून मिळवून दिले आहेत. शेतकऱ्यांच हित बघणार आमचं सरकार आहे. 

नारायण राणेंनी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख दिली‌. या पर्यटन जिल्ह्यासाठी मी योगदान देऊ शकलो. आमदार म्हणून तुमचं काम करू शकलो. आज व्यासपीठावर महायुतीचे तिन्ही उमेदवार आहेत. राजघराण्याचे युवराज लखमराजे भोंसले आमच्यासह आहेत. पुण्यश्लोक बापुसाहेबांच शताब्दी वर्ष सुरू आहे. पैशाला बळी पडणारी सावंतवाडीची जनता नाही हे पुन्हा एकदा दाखवून द्या. प्रेमाची ताकद दाखवून द्या. मी महायुतीचा उमेदवार आहे. हे शिवधनुष्य नरेंद्र मोदी यांनी उचललं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार त्यांना साथ देत आहेत‌. त्यांचे हात बळकट करा, महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी करा असं आवाहन दीपक केसरकर यांनी  केले.


लोकसभेची परतफेड करणार ; राणेबंधूंचा निर्धार

दरम्यान, निलेश राणे व नितेश राणे यांनी लोकसभेत नारायण राणेंसाठी मेहनत घेतलेल्या केसरकरांना विधानसभेत विजयी करत परतफेड करणार असल्याचा निर्धार केला. माझ्यासाठी लोकसभेला व्हॅनमधून गावागावात प्रचार करणारे दीपक केसरकर आहेत. ते सावंतवाडीचे आमदार म्हणून शोभून दिसत आहे. महायुतीच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी लोक रस्त्यावर उतरली असून तुमच्यासाठी जेवढं लागेल तेवढ सहकार्य करणार. विजयासाठी दिवसरात्र एक करणार असा विश्वास निलेश राणेंनी व्यक्त केला. लोकसभेची परतफेड विधानसभेत करणार असा विश्वास व्यक्त निलेश राणेंनी व्यक्त केला. तसेच नितेश राणे म्हणाले, दीपक केसरकर हे अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्रात शिक्षणमंत्री म्हणून क्रांती घडवणारे आमचे उमेदवार आहेत. सावंतवाडीत प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष बारकाईने आहे. कोणीही इकडेतिकडे करू नये. रात्री १० नंतर कोण कुठे काय करत ते ठावूक आहे. रविंद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे कोणी नेत्यांची नावं घेऊन नाटक करत असेल तर सहन केलं जाणार नाही. सगळ्यांच्या घरचे पत्ते आम्हाला माहीत आहेत. केसरकरांनी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी सरकारमधून एकनाथ शिंदे सोबत बाहेर पडले. हिंदुत्वासाठी पुढे आले. शिवसैनिकांवर अन्याय होऊ दिला नाही. लोकसभेत दीपक केसरकर यांनी दिवसरात्र एक केलं हे आम्ही डोळ्यांनी पाहिल. त्यावेळी मॅन ऑफ द मॅच बोलल्यावर काहींना मिरच्या झोंबल्य. त्यामुळे कोणाला मध्ये यायचं त्यांना येऊ देत लोकसभेची परतफेड विधानसभेत राणे करणार अस प्रतिपादन केले. 


सावंतवाडी येथील गांधी चौकात ही सभा झाली‌. यानंतर शेंकडो शिवसैनिकांच्या साथीने दीपक केसरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी खासदार नारायण राणे, महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक दीपक केसरकर, सौभाग्यवती पल्लवी केसरकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, युवराज लखमराजे सावंत -भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अँड. नीता कविटकर, भाजप जिल्हा संघटक महेश सारंग, संदीप कुडतरकर, केसरकर यांच्या कन्या सोनाली व जावई सिद्धार्थ वगळ आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.