२०१४ च्या विजयाची पुनरावृत्ती होईल : दीपक केसरकर

म्हापणातील उबाठाच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Edited by: दिपेश परब
Published on: October 22, 2024 10:45 AM
views 202  views

वेंगुर्ला : तालुक्यातील म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती विकास गवंडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विलास राऊळ, कोचरा शाखाप्रमुख आनंद मळेकर, निवतीचे माजी शाखाप्रमुख पुरुषोत्तम कोचरेकर, म्हापण शाखाप्रमुख मंदार चव्हाण, निवती महिला संघटक अर्चना कोचरेकर, मेढा ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटकर, तृप्ती कांबळी, अमिता राठवळ, माजी ग्रा प सदस्य राजश्री रांजणकर, सुरेश पडते यांच्यासाहित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या म्हापण, निवती, कोचरे व चिपी येथील सुमारे २५० कार्यकर्त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. 

     पाट हायस्कूल समोर असलेल्या शरयु मंगल कार्यालय हाॅलमध्ये सोमवारी (२३ ऑक्टोबर) हा भव्य प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुका संघटक बाळा दळवी व विभाग प्रमुख दत्ता साळगावकर यांच्या विशेष प्रयत्नातून या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

     यावेळी बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, जो सच्चा शिवसैनिक आहे, जो बाळासाहेबांच्या विचारांबरोबर राहिला ते शाखाप्रमुख आमच्याबरोबर येत आहेत याचा मला मनापासून आनंद आहे. तुमच्या मूळ घरात मी आपले स्वागत करतो. हिंदुत्वाचा विचार ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी शिवसैनिक राहणार ही वस्तुस्थिती आहे. मी जेव्हा पहिल्यांदा शिवसेनेमधून उभा राहिलो त्यावेळी याच शाखाप्रमुखानी मला निवडून आणले. खोटी, नकली, बेगडी लोक ज्यावेळी येतात त्यावेळी खरा माणूस पेटून उठतो. आणि हे आजच्या या प्रवेशावरून दिसत आहे. २०१४ मध्ये जो विजय आम्ही मिळवला निश्चितच त्याची पुनरावृत्ती होईल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरलार यांनी म्हापण येथे बोलताना व्यक्त केला. 

      यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, कोचरा सरपंच योगेश तेली, भोगवे सरपंच सौ. वायंगणकर, माजी सरपंच महेश सामंत, माजी पं स सदस्य प्रणाली बंगे, म्हापण उपसरपंच सुरेश ठाकूर, माजी सरपंच अभय ठाकूर, कोचरा माजी सरपंच सुनील करलकर, भोगवे सोसायटी चेअरमन चेतन सामंत, उपविभाग संघटिका सौ राऊळ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबा कोचरेकर यांनी केले. 

  

 वाटेल तशी मस्ती सहन करणार नाही : दीपक केसरकर 


काही स्वार्थी लोकांचा हाच उद्देश आहे की, गोव्याच्या जवळ हा भाग आहे. गोव्यात विमानतळ झालं, जमिनीच्या किमती वाढल्या, त्यांचा डोळा जमिनीवर असतो. याना कमिशन घेऊन जमिनी विकायचा असतात. याना मोठमोठी काँट्रॅक्ट पाहिजे असतात. लोकांकडून खंडणी वसूल करायची असते. मी तुमच्या हितासाठी उभा आहे. मला पाडण एवढं सोपं नाही, मी साई बाबांचा भक्त आहे.  त्यांच्या कृपेने व तुमच्या प्रेमाने मी इथे उभा आहे. यामुळे असल्या स्वार्थी लोकांना कधीही थारा देऊ नका त्यांचे पूर्व चरित्र काय आहे ते बघा. रस्त्यावर स्टोल घालून जे लोक धंदा करत होते त्यांच्याकडे राणे साहेबांच्या कृपेमुळे गडगंज पैसा आला. म्ह्णून वाटेल तशी मस्ती करायला लागले तर ती आम्ही सहन करणार नाही असा जोरदार टोला दीपक केसरकर यांनी लगावला. 

      जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना आता सदस्य म्ह्णून निवडून येऊ शकत नाही त्या लोकांबद्दल काय बोलायचे.  काही ठिकाणी खून होतात, डोक्यावर चिरे टाकले जातात, आणि अशी लोक उघडपणे तुमच्याकडे येतात आणि तुमच्या आमदाराबद्दल वाटेल ते बोलतात ज्याच्या कपड्यावर साधा आजपर्यंत एक डाग लागलेला नाही. असेही यावेळी दीपक केसरकर म्हणाले.