
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात लवकरच 'सुभाषचंद्र बोस शाळांची निर्मिती ' करण्यात येणार असून सावंतवाडी, वेंगुर्ला व सासोली याठिकाणी या शाळा लवकरच उभारण्यात येणार आहेत. ज्या शाळेत पटसंख्या कमी असते आणि तिथल्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी या शाळांची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० माध्यमिक शाळांना " सोलर हायब्रीड इन्व्हर्टर " चे वाटप करण्याचा कार्यक्रम येथील आर पी डी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवि मडगांवकर, शहर मंडल अजय गोंदावळे, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, भाजपचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्पे, सचिव गुरुदास कुसगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुहास देसाई, आर पी डी चे मुख्याध्यापक जगदीश धोंड, यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान यायला हवे ही आमची नेहमीच भावना राहिली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
याच पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रेरणेतून सर्व शाळा डिजिटल करण्याबरोबरच सौरऊर्जेच्या माध्यमातून ग्रीन शाळा ही संकल्पना राबविली जात आहे. शिक्षकांनी या सुविधांचा वापर करून पुढील काळात आपलं पूर्ण लक्ष हे मुलांच्या शिक्षणावर केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिक्षक हे मुलांचे जीवन घडवत असतात त्यामुळे अशा शिक्षकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची निश्चितच काळजी घेतली जाईल. त्यामुळेच शिक्षण मंत्री या नात्याने शिक्षकांसाठी जे जे करता आलं ते ते करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आगामी काळात सर्व शाळांना सोलरचा निधी देण्यात येणार आहे. डोंगरी शाळेंच्या पटसंख्येचा निकष २० वरून १५ वर आणण्यात आला आहे तर अल्पसंख्यांक प्रवर्गातील शाळांच्या पटसंख्येचा निकष तीस वरून वीस वर आणण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.त्याशिवाय प्राथमिक शाळेत निवृत्त शिक्षक देण्याचा निर्णय ज्या पद्धतीने घेतला त्याप्रमाणे माध्यमिक शाळांमध्ये निवृत्त शिक्षक घेण्याबाबत सरकार आगामी काळात निश्चितच विचार करेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिक्षकांची व्यथा शिक्षकच जाणू शकतो : आ. ज्ञानेश्वर म्हात्रे
शिक्षकांची व्यथा ही एक शिक्षकच जाणू शकतो. मी देखील एक शिक्षकच आहे त्यामुळे निवडून आल्यानंतर एकही दिवस वाया न घालवता केवळ शाळा शिक्षक व विद्यार्थी यांच्या उत्कर्षासाठी मी झटत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून कोकणातील जास्तीत जास्त शाळांना तसेच येथील शिक्षकांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्पष्ट केले.