सिंधुदुर्गसारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रात कुठेही नाहीत : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: September 30, 2024 05:40 AM
views 111  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गसारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रात कुठेही नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वोत्कृष्ट लागण्याच श्रेय जसे विद्यार्थ्यांना आहे तसेच ते गुणवंत शिक्षकांना देखील आहे असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ आयोजित शिक्षक, विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. 

ते म्हणाले, गुणवंत शिक्षक या जिल्ह्यात आहेत त्यामुळे गुणवंत विद्यार्थी इथे घडू शकतं आहे. अशा विद्यार्थ्यी व शिक्षकांच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. माझ्या वडीलांच्या नावानं अशा शिक्षकांचा गुरू सेवा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. पुरस्कार विजेते शिक्षक व बक्षीस पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्री म्हणून अभिमान आहे असं प्रतिपादन मंत्री केसरकर यांनी केलं. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी आयोजित शिक्षक, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आर.पी.डी. हायस्कूल, सावंतवाडी येथे पार पडला. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिले जाणारे गुरुसेवा पुरस्कार व शिक्षकांचा विशेष पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आले. 

तसेच दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हयातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यासाठी घेतलेल्या ऑनलाईन समूहनृत्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण, रोख रक्कम व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले गेले. फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत - शिष्यवृत्ती धारक तीन तालुक्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तालुक्यातील यशस्वी मुलांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविले. तसेच गुरुसेवा पुरस्काराने शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री यांच्या उपस्थितीत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, भरत गावडे आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.