गणेश मूर्तींकारांसह भजन मंडळांसाठी विशेष उपक्रम

गणरायाची सेवा म्हणून उपक्रम राबविणार : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: July 16, 2024 09:23 AM
views 366  views

शिक्षण विभागात धोरणात्मक निर्णय !

सावंतवाडी : गणेशोत्सव जवळ येत असून भजन मंडळांना तबला, पेटी, टाळ-मृदंग माझ्या माध्यमातून देणार आहे. गणरायाची सेवा म्हणून आपण हे करतो. त्याबाबतचा सर्वे देखील केला जाणार असून भजन मंडळांच्या संस्थेनं कार्यालयाशी संपर्क साधावा अस आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. तसेच गणेश मुर्तीकारांसाठी देखील सिंधुरत्न मधून एखादी योजना राबविण्याबाबत मनोदय असल्याचं ते म्हणाले. तसेच शिक्षण खात्यातील धोरणात्मक निर्णयांची माहीती याप्रसंगी दिली. 

ते म्हणाले, जनतेच्या सदिच्छा माझ्यासोबत नेहमीच राहिल्या आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करावे तेवढे थोडे आहे. सिंधुदुर्गच्या जनतेनं दिलेल्या प्रेमामुळेच अनेक क्रांतिकारी निर्णय मी घेऊ शकलो. शिक्षणाच्या संबंधितल्या निर्णयांची यावर्षीपासून अंमलबजावणी सुरू होणार आहे. स्काऊट अॅण्ड गाईड, कृषी, हॅप्पी सॅटर्डे, महावाचन उत्सव, माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केले आहे. लवकरच दत्तक शाळा या उपक्रमांतर्गत बऱ्याच शाळा दुरूस्त होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दरम्यान, स्वखर्चाने जिल्ह्यातील बहुतांश शाळांत पावसापूर्वी डागडुजी करून घेतली होती. शाळा नं. एक ही दुरूस्तीच्या यादीत नव्हती. आपत्कालीन परिस्थितीमुळे मातीची भिंत असल्याने ती कोसळली. सुदैवाने सुट्टी होती त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. यासाठी ईश्वराचे धन्यवाद द्यावे लागतील. भिंती ओल्या असतील तर त्या ठिकाणी मुलांना बसवू नका, अधिक अडचण असल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन सर्व मुख्याध्यापकांना त्यांनी केल. तसेच तिनं निवासी शाळा जिल्ह्यासाठी मंजूर केल्या आहेत. भरती प्रक्रियेत ज्या शिक्षकांना संधी मिळाली नाही त्यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकऱ्या दिल्या आहेत. डीएड, टिईटी पास असणाऱ्यांचा तात्पुरत्या स्वरूपात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वापर केलेला आहे. अतिपावसाचे व दुर्गम जिल्हे असल्याने याबाबतचा नियम लागू केला आहे. कायमस्वरूपी नोकऱ्या देताना नियमांचे पालन कराव लागत. अन्यथा कोर्टात ते टिकत नाही. वेगळा नियम एखाद्या जिल्ह्याला लावता येत नाही. कोकणातील परिस्थिती लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात डीएड, बीएड बेरोजगारांचा वापर करून घेण्याची परवानगी दिलेली आहे. पहिली भरती झालेली असून दुसरी भरती ही खासगी शाळांची आहे‌. त्याची देखील प्रकिया सुरू होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. दहा लाख मुलांना महिना दहा हजार दिले जाणार आहे‌. महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली आहे. टीका करणारे लोक आमचे अर्ज वाटत फिरत आहेत ही गोष्ट चांगली आहे. वारकऱ्यांसाठी महामंडळ देखील स्थापन होत आहे. स्वच्छ दिंडीची संकल्पना शासन राबवित आहे.शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना सरकारने पुरविल्या आहेत. टप्पा अनुदानाचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. आदर्श विद्यार्थी महाराष्ट्रात घडायला खऱ्या अर्थानं सुरूवात झालीय.

महावाचन उत्सव, बिग-बी ब्रॅण्ड अॅम्बेसीडर

यावेळी केसरकर म्हणाले, मुलांना सततच्या टीव्ही, मोबाईल यापासून लांब नेण्यासाठी महावाचन उत्सव साजरा केला जाणार आहे. एक लाखापेक्षा अधिक शाळांनी यात नोंदणी केली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या अभियानाचे ब्रॅण्ड अॅम्बेसीडर म्हणून काम करण्याच मान्य केलं आहे. त्यांचे वडील देखील कवी, साहित्यिक होते. वाचनाच महत्व या महान नेत्याला आहे‌. त्यासाठीच ते आम्हाला सहकार्य करणार आहे. याबद्दल त्यांचे धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत. तर शिक्षण विभागातील टेंडरच्या चर्चीत बातमीबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, असं काही घडलं असतं तर अधिवेशनातच मोठा गदारोळ झाला असता. 


जर्मनीत 'फिल अॅट होम'ची काळजी

राज्यातील लाखो कौशल्य प्राप्त मुलांना जर्मनीत नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त होत आहे. यासाठी आपण विशेष मेहनत घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यामुळे हे शक्य झालं आहे. मुंबईचा पालकमंत्री म्हणून जर्मनीशी असलेल्या संबंधांचा फायदा सर्वसामान्य मुलांना व्हावा, महाराष्ट्रातील मुलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा यासाठी माझे प्रयत्न आहेत. जर्मनीत त्यांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. अडीच ते तीन लाख महिना पगार ते कमावू शकतात. यासाठी जर्मन भाषा येणं आवश्यक आहे. त्याच प्रशिक्षण देखील सरकारच्या माध्यमातून मुलांना दिलं जातं आहे‌. या सुवर्णसंधीचा फायदा मुलांनी घ्यावा. मराठी भाषा मंत्री असल्यानं तेथिल मराठी परिषदांशी आपला संपर्क आला. त्यामुळे तेथील मराठी बांधव आपल्या मुलांना 'फिल अॅट होम' वाटेल याची काळजी घेतील असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.